विरोधी पक्षाचा नारा : रस्ते टिकवा आणि माथेरानला वाचवा ! 

“रस्ते टिकवा, माथेरान वाचवा” माथेरानमध्ये विरोधकांची बॅनरबाजी!

माथेरान : मुकुंद रांजाणे 

माथेरामध्ये हिरव्यागार वनराईने नटलेला संपूर्ण परिसर आणि एकूणच ५२ किलोमीटरचे लाल तांबडया मातीचे रस्ते हेच खरे माथेरानचे सौभाग्य आहे.परंतु अनेक वर्षांपासून ह्या सौभाग्याकडे नगरपालिका प्रशासनाचा कानाडोळा होत असल्यामुळे माथेरानच्या रस्त्यांची खरी ओळख हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे.
यापूर्वी दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या बाजूच्या गटारांची,मोऱ्याची नियोजनबद्ध पद्धतीने कामे केली जात असत.रस्त्यांची धूप होऊ नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने जवळपास एकहजारांहून अधिक बंधारे बांधले जात होते. परंतु पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना देखील नगरपालिकेने ही कामे अद्याप हाती घेतलेली नाहीत.त्यामुळे रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे व्यवसायावर त्याचप्रमाणे इथल्या पर्यटनांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता विरोधी पक्ष नेते माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि अजय सावंत यांच्या कडून वर्तवली जात आहे. त्याबाबत त्यांनी “रस्ते टिकवा,माथेरान वाचवा”अशी बॅनरबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्याधिकारी यांनी यासाठी सत्ताधारी गटाला विचारात घेऊन माथेरानच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.अन्यथा अंतर्गत वादात माथेरानचे रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.रस्ते ही माथेरानची शान अन आकर्षण आहे.मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून अनेकजण हे केवळ याच रस्त्यावर मनमोकळे पणाने पायी सैर करण्यासाठी पर्यटक हमखास येत असतात. पर्यटनावर इथल्या सर्वांचे जीवनमान अवलंबून आहे. या खराब रस्त्यांमुळे घोडेवाले, हातरिक्षा चालक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हॉटेल धारक लॉज वाले, व्यापारी वर्ग आणि स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना देखील सोयीस्कर होईल असे उत्तम दर्जाच्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर करावीत या आशयाचा बॅनर लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.त्याबाबत त्यांनी प्रशासनाच्या विरोधात श्रीराम चौकात जाहीर बॅनर लावून ही कामे जलदगतीने करण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष अजय सावंत आणि मनोज खेडकर यांनी नगरपालिका प्रशासनाला केले आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत