विवाहबाह्य संबंध अपराध नाही! बाहेरख्याली पुरुषांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

विवाहबाह्य संबंध प्रतिबंधक कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या एका याचिकेवर राखून ठेवलेला निकाल आज देण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाने एकमताने ४९७ कलम रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. याचा अर्थ असा की एकाद्या पुरुषाचे विवाहीत महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असतील तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकणार नाही. व्याभिचार किंवा विवाहबाह्य संबंध हे घटस्फोटासाठी महत्वाचे कारण ठरू शकेल असे सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक खंडपीठाने म्हटले आहे.

विवाहबाह्य संबंधासाठीच्या गुन्हय़ासाठी असलेल्या कलम 497 ला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज आदेश सुनावण्यात आला. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमुर्ती आर.एफ.नरीमन, न्यायमुर्ती डी.वाय.चंद्रचूड़, न्यायमुर्ती इंदू मल्होत्रा आणि न्यायमुर्ती ए.एम.खानविलकर यांच्या संविधानपीठाने हा निर्णय दिला आहे.  हा कायदा एकतर्फी असून त्याचा फटका केवळ पुरुषांना बसतो. या कायद्यानुसार महिलांवर गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांच्यासाठीही शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे या कायद्यात महिलांसाठीही शिक्षेची समान तरतूद करावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. हिंदुस्थानात कलम 497 नुसार फक्त पुरुषालाच शिक्षेची तरतूद आहे.

महिला आणि पुरुषांना समान अधिकार आहेत असं म्हणताचाच न्यायालयाने हे कलमच रद्द करण्याचे आदेश दिले.विवाहबाह्य संबंध हा अपराध नाही मात्र त्या संबंधांमुळे महिला किंवा पुरुषाचा साथीदार आत्महत्या करत असेल तर आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं न्यायालय म्हणाले आहे.

IPC च्या कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने विवाहीत महिलेशी तिच्या पतीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवले तर तो बलात्कार ठरत नाही, मात्र आत्तापर्यंत हा गुन्हा मानला जात होता आणि त्यासाठी त्या पुरुषाला शिक्षा ठोठावण्याचीही तरतूद गोती. या गुन्ह्यासाठी पुरुषाला पाच वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होत होती. या कलमामध्ये ज्या स्त्रीशी हे संबंध ठेवले गेले, त्या स्त्रीला मात्र दोषी ठरवता येत नव्हतं. विधवा, वेश्या किंवा अविवाहित महिलांसाठी हे कलम लागू नव्हतं.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत