वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढवणार?

वीरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढवणार?

नवी दिल्ली: रायगड माझा वृत्त

माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हरियाणाच्या रोहतक लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर सेहवाग लोकसभा निवडणूक लढवू शकतो. भाजपकडून सध्या याठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. त्यामध्ये वीरेंद्र सेहवाग याचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रविवारी भाजपच्या सुकाणू (कोअर) समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी वीरेंद्र सेहवागच्या नावावर चर्चा झाली. रोहतक हा हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदर सिंह हुड्डा यांचे चिरंजीव दिपेंदर सिंह हुड्डा यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून दिपेंदर सिंह हुड्डा यांनी सलग तीनवेळा विजय मिळवला आहे. अशावेळी दिपेंदर हुड्डा यांचे वर्चस्व मोडून काढायला सेहवागच्या लोकप्रियतेचा फायदा होऊ शकतो. मात्र, सेहवागच्या उमेदवारीविषयी विचारणा केली असता भाजपच्या नेत्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

मात्र, पडद्याआड यासाठीच्या सर्व हालचाली सुरु आहेत. रोहतकमधून निवडणूक लढवण्यासाठी वीरेंद्र सेहवागला राजी करण्याची जबाबदारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. भाजपने सेहवागचे नाव निश्चित केले आहे. त्यामुळे आता सर्व काही सेहवागच्या होकारावर अवलंबून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अत्यंत सक्रिय असणाऱ्या नेत्यांवर सेहवागच्या मनधरणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दरम्यान, सेहवागने नकार दिल्यास या जागेसाठी प्रसिद्ध सुफी गायक हंसराज हंस यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो. हंसराज हंस यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशानंतर हंसराज रोहतक मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. २०१४ मध्ये हरियाणातील लोकसभेच्या १० जागांपैकी भाजपने सात, आयएनएलडीने २ आणि काँग्रेसने एक जागा जिंकली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत