वेळ प्रसंगी औरंगाबाद महापालिका बरखास्त करु, मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

औरंगाबादच्या कचराप्रश्नी नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला शिवसेना नेत्यांनी दांडी मारली. कचराप्रश्नी कठोर निर्णय घ्या, कुणाचंही ऐकून घेऊ नका, वेळ प्रसंगी औरंगाबाद महापालिका बरखास्त करु, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
नागपुरात झालेल्या बैठकीला महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेता आणि स्थायी समितीच्या अध्यक्षांनी दांडी मारली. विशेष म्हणजे औरंगाबाद महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची सत्ता आहे. महापौर शिवसेनेचे आहेत. तर उपमहापौर भाजपचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिल्याची माहिती बैठकीतील सूत्रांनी दिली.
नागपुरात झालेल्या बैठकीला एमआयएम आमदार इम्तियाज जलील, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचं कुणीही उपस्थित नव्हतं. बैठक संपण्याच्या पाच मिनिट अगोदर शिवसेना आमदार संजय शिरसाठ आले. विधानसभेत हक्कभंगावर भाषण असल्याने उशिर झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
कचरा प्रश्न गंभीर 
या बैठकीत औरंगाबाद कचराप्रश्न, जल वाहिन्या, बाळासाहेब ठाकरे स्मारक यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला.पावसाळा सुरु झाल्यापासून औरंगाबादचा कचराप्रश्न आणखी गंभीर बनला आहे. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी सुटली आहे, तर पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये नाकाला रुमाल लावून चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शिवसेनेचे नेते मात्र मातोश्रीवर 
विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीऐवजी ‘मातोश्री’वरच्या बैठकीला जाणं पसंत केलं. औरंगाबादच्या कचराप्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.मुंबईतल्या बैठकीला शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष उपस्थित होते.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत