व्हाट्सअँप ग्रुपची सामाजिक बांधिलकीतून आदिवासीच्या घराचे छप्पर बसले!

नेरळ : अजय गायकवाड

2 जून रोजी आलेल्या वादळात तालुक्यातील एका आदिवासी वाडीतील कुटुंबाच्या घरकुलाला लावलेले सिमेंट पत्र्याचे छप्पर उडून गेले होते. पावसात ते कुटुंब कुठे राहणार? असा प्रश्न उपस्थित राहिला असता कर्जत तालुक्यात व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या आठ दिवसात त्या घरावर कौलारू छप्पर टाकले गेले आहे. दरम्यान,सोशल ग्रुपच्या माध्यमातून आपल्या ग्रुप मधील सदस्यांच्या पुढाकाराने आणि मदतीने एवढे मोठे काम कोणत्याही प्रसिद्धीच्या झोतात न येता उभे झाले असून या ग्रुपचे आणि अशी कल्पना मांडणाऱ्या ग्रुप अडमीनचे कौतुक होत आहे.

कर्जत तालुक्यातील घडामोडी यांची माहिती व्हावी यासाठी सार्वजनिक क्षेत्रात काम करणारे दोन तरुण पत्रकार “कर्जत अपडेट”या नावाने व्हाट्सअँप ग्रुप चालवितात.तालुक्यातील घडामोडीसाठी वाहलेला हा ग्रुप समाजातील सार्वजनिक, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी
गेली काही महिने पुढाकार घेत आहे.कर्जत तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी,तालुक्यातील लोकप्रतिनिधी,सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व शासकीय विभागांचे अधिकारी या ग्रुपवर सदस्य आहेत. 250 सभासद असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपवर सातत्याने तालुक्याचे प्रश्न सदस्य मांडत असल्याने या ग्रुपची चर्चा समाजातील अनेक प्रश्नावर होत असते. कर्जत तालुक्यात 1 आणि 2 जून रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला होता. त्यावेळी आदिवासी भागातील अनेक घरांचे नुकसान झाले होते. मात्र ओलमण ग्रामपंचायत मधील दुर्गम भागात असलेल्या तेलंगवाडी येथील हनुमान आलो पादिर यांचे मे 2018 मध्ये बांधलेल्या घरावर टाकलेली 80 पत्रे उडून गेली होती. त्याचवेळी लागोपाठ दोन दिवस झालेला पाऊस यामुळे घराच्या भिंती भिजून गेल्या होत्या,तसेच घरातील सर्व खोल्यात पाणी साचले होती.त्यामुळे त्या किमान 15 जणांचे कुटुंबाने कुठे राहायचे?असा प्रश्न निर्माण झाला होता.

या घराबद्दल वृत्तपत्रात बातम्या आल्यानंतर अगदी 4 जून रोजी कर्जत अपडेट या ग्रुप वर तेलंगवाडी प्रश्नी आवाहन करण्यात आले.पंतप्रधान आवास योजनेतून मिळालेल्या अनुदानातून बांधलेल्या घरावर छप्पर घालण्यासाठी त्या कुटुंबाला 80 हजार खर्च आला होता.मात्र सिमेंट पत्रे त्या घरावर घालणे धोकादायक असल्याचे ग्रुप सदस्य असलेल्या सिव्हिल इंजिनीअर यांनी सांगितल्याने आणि कौले घालण्यापूर्वी घराची उंची वाढवुन कौलारू छप्पर घालण्याचा सल्ला मिळताच हालचाल सुरू झाली. ग्रुप वरील सदस्यांनी मदतीचा हात पुढे केल्याने घरावर नवीन छप्पर बसले आहे.

केवळ सहा दिवसात 2000 विटा,2000 कौले उपलब्ध करून घेण्यात आली.त्याचवेळी मजुरी अशी कामे करून 10जून रोजी हनुमान आलो पादिर यांच्या घरावर नवीन आणि मजबूत छप्पर घातले गेले आहे.ही कामे होत असताना अनेक ग्रुप मेंबर यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तेलंगवाडी गाठून पाहणी केली आहे.त्यामुळेच घराचे छप्पर कोसळून झाल्यानंतर ते पुन्हा आठ दिवसात अनेकांच्या मदतीने उभे राहिले आहे.या सर्व कामात कर्जत अपडेट ग्रुप मधील मदतीचा हात पुढे करणाऱ्या कोणत्याही सदस्याला प्रसिद्धी नको आहे.त्यांनी आपण मदत केली ही सामाजिक बांधिलकी म्हणून,त्यामुळे त्याची माहिती कोणालाही देऊ नये असे देखील सांगितले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत