शनी मंदिर सरकारच्या ताब्यात, विधेयक मंजूर!

नागपूर : रायगड माझा वृत्त 

अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिर आता राज्य सरकारच्या ताब्यात आलं आहे. शनी मंदिराच्या चौथऱ्यावर आता महिलाही जाऊ शकतील. कारण राज्य सरकरने विधानसभेत त्याबाबतचं विधेयक मंजूर केलं.
शनी मंदिर सरकारच्या ताब्यात, विधेयक मंजूर!
 
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त विधेयक 2018 विधानसभेत काल रात्री 12.30 वाजता मंजूर करण्यात आलं. सध्याच्या सार्वजनिक न्यासाची पुनर्रचना करुन नवीन अधिनियमाद्वारे शनैश्वर देवस्थान राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली येणार आहे.देवस्थानचे व्यवस्थापन अधिक व्यापक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याबरोबरच भाविकांना उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हा स्वतंत्र कायदा असेल.
 
शनैश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे, मात्र तेथे येणाऱ्या भाविकांसाठी कोणत्याही सोयी सुविधा नाहीत. या मंदिराच्या विश्वस्त मंडळाने अनेकवेळा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला असून, सध्याच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारने हे विधेयक आणले.
 
काय आहे शनी मंदिराचा वाद :
 
शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश बंदी होती. मात्र 28 नोव्हेंबर 2015 रोजी एका महिलेने चौथऱ्यावर जाऊन शनीवर अभिषेक केला होता. महिलेने 400 वर्षांची परंपरा मोडित काढत शनिदेवाला अभिषेक केला. या घटनेनंतर 7 सुरक्षारक्षकांना निलंबित करण्यात आलं होतं.
महिला भक्ताने शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन त्याचं दर्शन घेत तेलाचा अभिषेक केल्याचं प्रकरण उघडकीस येताच शिंगणापूरसह राज्यभरात चांगलाच गदारोळ माजला. मात्र, तिने शनिदेवाचं दर्शन घेणं ही एका क्रांतीची नांदी असल्याचं सांगत सामाजिक स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला.दुसरीकडे महिलेने थेट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध सभा घेतल्या. इतकंच नाही तर शनीच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक करुन शुद्धी करण्याचाही घाट घातला होता.
शनी मंदिर सरकारच्या ताब्यात, विधेयक मंजूर!
मात्र 8 एप्रिल 2016 रोजी शनी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांनी चौथऱ्यावर प्रवेश करुन शनीदेवाचं दर्शन घेतलं. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर समितीने महिलांना दर्शन खुलं केलं. त्यानंतर भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पुष्पक केवडकर आणि प्रियांका जगताप यांनी थेट शनी चौथरा गाठला आणि शनीदेवाला पुष्पहार अर्पण करुन तेल वाहिलं.
दुसरीकडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी महिलांना मंदिर प्रवेशासाठी न्यायालयीन लढा दिला होता. त्यावेळी 1 एप्रिल 2016 रोजी हायकोर्टाने मंदिरामध्ये महिलांना मिळणाऱ्या प्रवेशाचा मार्ग आता मोकळा करुन दिला होता. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने राज्य सरकारला आपल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्या लढ्याला मोठं यश आलं होतं.
“कायद्याने महिलांना कुठेही प्रवेश बंदी केली जावू शकत नाही. असं असताना शनि शिंगणापूर येथे महिलांना प्रवेश कसा नाकारला जातो?” असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालायने राज्य सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत