शरद पवारांच्या उपस्थितीत होणार शेकापचे अधिवेशन!

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

औरंगाबादेतील कर्णपुरा मैदानावर येत्या एक व दोन ऑगस्टला भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) दोन दिवसीय अधिवेशन होणार आहे. शेकापच्या या सतराव्या अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मार्क्‍सवादी पक्षाचे सिताराम येचूरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची, माहिती शेकापचे जिल्हा चिटणीस विकासकाका शिंदे यांनी बुधवारी (ता. 25) पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवारांच्या उपस्थितीत होणार शेकापचे अधिवेशन!

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे जेष्ट नेते गणपतराव देशमुख असतील. अधिवेशनात विधानसभेच्या निवडणूकपुर्वीची राज्यातील समविचारी पक्षांची ऐक्‍याची भुमिका यावर मंथन होणार आहे. समारोपप्रसंगी विविध राजकीय ठराव पारित करण्यात येणार आहेत. मराठवाड्यावर आजवर झालेल्या अनुशेषासंदर्भातील अन्यायावर व्यापक चर्चा होणार आहे. 

या चर्चेतून राजकीय ठराव पारित करण्यात येणार असल्याचेही भाई विकास शिंदे यांनी सांगितले. अधिवेशनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 10 हजारावर व्यक्ती सहभागी होतील. त्यासाठी सात मंगलकार्यालयात साधारण सहा हजारावर व्यक्तींची रहाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र एक मंगलकार्यालय असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अधिवेशनात शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, एन. डी. पाटील, विवेक पाटील, मिनाक्षी पाटील, धैर्यशिल पाटील आदि मान्यवर मार्गदर्शन करतील.

मराठा आंदोलनाबाबत बोलताना शेकापचा मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला तालूका चिटणीस निवृत्ती गायकवाड, गणेश सोनवणे, चंद्रकांत सरोदे, युनूस पठाण, नारायण घाईट, अंजन साळवे, ऍड. भाई सरवदे, महेश गुजर यांची उपस्थिती होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत