शरद पवारांना माढ्यात सहकार्य-नितेश राणे

करमाळा : रायगड माझा वृत्त

सध्या देशात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळण्याची शक्‍यता नाही. अशा परिस्थितीत शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदासाठी येत असेल, तर आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभा राहिले पाहीजे. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सर्व ताकदीनीशी सहकार्य करणार असल्याची माहिती आमदार नीतेश राणे यांनी दिली.

वांगी (ता. करमाळा) येथे राणे कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.आमदार नीतेश राणे म्हणाले, की माढा लोकसभा मतदारसंघातून पवार उभे राहणार आहेत. माढा मतदारसंघात जिथे-जिथे स्वाभिमानी पक्षाची ताकद आहे, त्या ताकदीनुसार त्यांना निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्न रहणार आहेत.

शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. पवार पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये आहेत. जर आपला माणूस पंतप्रधान होत असेल तर आपण सहकार्य केले पाहिजे. भाजप-शिवसेनेची युती झाली तर स्वाभिमानी पक्ष त्यांच्याबरोबर नसेल, अशी भूमिका अगोदरच आम्ही स्पष्ट केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या विरोधात आमचे उमेदवार लोकसभेला उभे राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

या शासनाने जीएसटी, नोटाबंदी यांसारखे विषय एका रात्रीत मार्गी लावले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, विद्यार्थांचे प्रश्‍न, आमदाराचे प्रश्‍न सुटले नाहीत, आरक्षणाचे भिजत घोंगडे तसेच ठेवले आहे. धनगर आरक्षणाचा विषय पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडतो, असे आश्‍वासन दिले असताना अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले; मात्र मराठा समाजातील तरुणांसाठी कर्जप्रकरणे होत नाहीत, बॅंका चुकीची उत्तरे देतात. आता बॅंका फोडण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत