शरद पवारांनी सत्तेसाठी चारवेळा पक्षांतर केले: माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर

रायगड माझा वृत्त 

शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

शरद पवारांमुळे काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काँग्रेसचे नुकसान झाले. आता त्यांचे तसेच होत आहे. पवार फोडाफोडी करून मुख्यमंत्री झाले. स्वतः पवारांनी एकदा-दोनदा नव्हे तर चार वेळेस पक्ष सोडला. त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडली. दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला. अशा पवारांना आता पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवाल शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण आहेत? असाही सवाल निलंगेकरांनी शरद पवारांना केला. पवार हे राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील विलक्षण व्यक्तिमत्व आहे. पवारांनी आपल्या राजकीय वाटचालीत अनेकांना धोबीपछाड दिली. कित्येक सहकाऱ्यांचे पराभव घडवून आणले. विलासराव देशमुखांना शरद पवारांनी पराभूत केलं. पण आता पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य कमी झाल्यानं भाजपच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीतून सर्वाधिक भरती होत आहे, असे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत