शरद पवारांसह पवार कुटुंबातील तीन सदस्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : रायगड माझा वृत्त

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबातील आणखी तीन सदस्य लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे पवार कुटुंबातील चौघा जणांची प्रतिष्ठा यंदा पणाला लागली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. कोणत्या मतदारसंघातून कोणी निवडणूक लढवायची, यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.

बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांची कन्या म्हणजेच बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत. शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करत आहेत, तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून नशीब आजमावण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे या गेल्या वेळी लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरणाऱ्या पवार कुटुंबातील एकमेव सदस्य होत्या. पवार कुटुंबीयांनी निवडणूक लढवली, तर फक्त त्या-त्या मतदारसंघातीलच नाही, तर राष्ट्रवादीच्या इतर जागा जिंकण्याची शक्यताही वाढेल, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा अंदाज आहे. तसंच राष्ट्रीय राजकारणातही राष्ट्रवादीचा वरचष्मा राहील, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

शरद पवारांनी 2009 साली सोलापुरातील माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. त्याआधी, जवळपास दोन दशकं राखलेली बारामतीची जागा त्यांनी लेकीसाठी सोडली होती. सुप्रिया सुळे सलग दुसऱ्यांदा बारामतीतून खासदार आहेत. त्यामुळे पवारांनी पुणे किंवा माढ्यातून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. मात्र पुण्यातील जागेवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

तर दुसरीकडे, अजित पवार ज्या शिरुर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत, तिथे गेल्या 15 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व आहे. शिवाजीराव आढळराव-पाटील मोठ्या मताधिक्याने जिंकून येत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाना आपली प्रतिष्ठा पणाला लावताना डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हे देखील मावळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेले काही महिन्यांपासून पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघ पिंजून काढला आहे, मात्र शिवसेना आणि भाजपची युती झाल्याच पार्थ पवारांना हि निवडणूक कठीण जाणार असल्यचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात पवार कुटुंबापैकी कोण कशी बाजी मारतोय ते पाहणे आता महत्वाचे ठरणे आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत