‘शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना पाठिंबा देईल’

'शरद पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना पाठिंबा देईल'

नाशिक : रायगड माझा वृत्त

पवार पंतप्रधान होणार असतील, तर शिवसेना त्यांना पाठिंबा देईल असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. मराठी माणसाच्या मुद्यावर शिवसेना सकारात्मक आहे. त्यामुळे पवार पंतप्रधान होणार असतील तर शिवसेना त्यांना नक्की पाठिंबा देईल, असा विश्वास भुजबळांना वाटतो. प्रतिभाताई पाटील यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीलाही शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. त्यामुळे पवारांसाठीही शिवसेना पक्षीय मतभेद बाजुला ठेवेल असं भुजबळांना वाटतं आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेना संपणार नाही असंही त्यांनी म्हटलंय.

शरद पवार माढ्यातून लढणार?

दरम्यान शरद पवार हे यावेळची लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढण्याची चर्चा सुरु झाली आहे. मी माढ्यामधून निवडणूक लढवावी, अशी पक्षातील नेत्यांची मागणी आहे. पण मी त्यावर अजून निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांच्या मागणीवर मी विचार करेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक नेत्यांची एक बैठक पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह माढ्यातील सध्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेसाठी काही मतदारसंघातील उमेदवारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी माढ्यातून शरद पवार यांनीच निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्षातील नेत्यांकडून पुढे आली.

माध्यमांमध्ये यावर वृत्त प्रसारित झाल्यानंतर शुक्रवारी दुपारी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माढ्यामधून मी निवडणूक लढवावी, अशी पक्षातील सगळ्याच नेत्यांची इच्छा आहे. त्यांनी ती माझ्याजवळ बोलून दाखवली आहे. खुद्द विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही अशी इच्छा व्यक्त केली आहे. पण मी यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. खरंतर माझी इच्छाही नाही. पण पक्षातील नेत्यांचे असे म्हणणे आहे की, तुमचे सर्व धोरणात्मक निर्णय आम्ही ऐकतो. आता आमची इच्छाही तुम्ही ऐकावी. मी यावर विचार करेन, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत