शहरात 28 हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकामे

बांधकाम विभागाचे दुर्लक्षः हॉटेल मालकांना बजावल्या नोटीस

पिंपरी :रायगड माझा 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 28 हॉटेल मालकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाची परवानगी आणि अग्नीशामक विभागाचा ना हरकत दाखला न घेता वाढीव अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे हॉटेल चालविणा-या 28 मालकांना नोटीस बजाविण्यात आल्या असून त्या हॉटेलवर कारवाई करण्याकडे बांधकाम व परवाना विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केले आहे.

मुंबईतील कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये लागलेल्या आगीत 14 नागरिकांचा नाहक जीव गेला. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत हॉटेल्सचे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर अनधिकृतपणे हॉटेलमध्ये वाढीव बांधकाम केलेले व सुरक्षेदृष्टीने हॉटेलमध्ये कुठलीच व्यवस्था नसल्याने अग्निशामक विभागाचा ना हरकत दाखला (एनओसी) नसलेल्या सर्व हॉटेल्सवर धडक कारवाई करणे आवश्‍यक आहे.

शहरात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे. तसेच, हॉटेल चालविलेल्या ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करुन व्यवसाय करता येत नाही, असे असले तरी, शहरात मोठमोठ्या हॉटेल मालकांनी महापालिकेला अंधारात ठेवून अनधिकृतपणे हॉटेल व्यवसाय तेजीत सुरू आहे.

शहरातील नामांकित हॉटेल्समध्ये रूफ टेरेस करून अतिरिक्त व असुरक्षित काम करण्यात आले आहे. तसेच पार्किंगमध्ये व्यावसायिकांनी बिनदिक्कतपणे हॉटेल व्यवसाय चालू केला आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जेवणाचा अस्वाद घेण्यास येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनधिकृत वाढीव बांधकाम, अतिक्रमण आणि अग्निशामक परवाना आहे किंवा नाही हे तपासले गेले आहे.

यामध्ये 28 हॉटेल मालकांना नोटीस बजाविली असून ती अनधिकृतपणे चालविली जात आहे. त्यात चिखलीतील सूर्याजी हॉटेल, न्यू पुर्णा हॉटेल, बो-हाडेवाडीचे सिल्वर ब्लू हॉटेल, भोसरीतील विश्वविलास बिर्याणी हॉऊस, खराळवाडीतील हॉटेल लोटस कोर्ट, मोरवाडीतील वार्विक्‍यू नेशन, साने चौकातील हॉटेल तन्मय बार-रेस्टोरंट, नाशिक फाट्याचे हॉटेल अशोका, कासारवाडीचे हॉटेल शेर ए पंजाब, हॉटेल पिनॅकल, पिंपरीतील हॉटेल रौनक फॅमिली रेस्टोरेंट, वाकडचे सयाजी हॉटेल, हॉटेल अवसोलूट बार्विक्‍यू, हॉटेल विशाल कासार, पिंपळे सौदागरचे डिग्रीज, योलो गॅस्ट्रो बार, वे लीफ बिस्ट्रो हे सर्व हॉटेलमध्ये अनधिकृत बांधकाम तपासणीत आढळून आले आहे.

“त्या’ हॉटेलवर कारवाई निश्‍चित…
तसेच अग्नीशामक विभागाने “रुफ टॉप’ हॉटेलची केलेल्या संयुक्त तपासणीत नाशिक फाटाचे मराठा खानावळ, लांडेवाडीचे ब्लू पाल्मस, चोवीसावाडीचे बरासु व्हेज ऍण्ड नॉनव्हेज, उद्यमनगरचे आर.आर.हॉटेल, हॉटेल एम्पायर गार्डन, धावडेवस्तीचे हॉटेल सोनाली बार आणि रेस्टोरंट, हॉटेल प्रतिक, मोशीचे हॉटेल सिल्वर ब्लू, निगडी प्राधिकरणातील हॉटेल कृष्णा, हॉटेल तरंगण, चिंचवडचे हॉटेल सूर्यकिरण, मोरवाडीचे सेन्ट्रल मॉल, पिंपरीतील क्रिस्ट्रल कोर्ट, प्राधिकरणातील हॉटेल सावली यासह अनेक हॉटेल मालकांकडे अग्नीशामक विभागाचा “ना हरकत’ दाखला घेतलेला नाही. याबाबत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्सचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत