शहिदाचे अंत्यदर्शन; भाजपचे बर्थ डे सेलिब्रेशन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शहीद मेजर कौस्तुभ प्रकाशकुमार राणे यांना वीरमरण आले असल्याचे वृत्त मंगळवारी समजताच संपूर्ण मीरा रोडच्या शीतलनगर भागात शोककळा पसरली होती. मेजर राणे यांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी नातेवाईक, मित्र परिवार त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते. तर दुसरीकडे भाजपचे मिरा-भाईंदरचे पदाधिकाऱ्यांचे बर्थ डे सेलिब्रेशन सुरु होते. भाजपचे पदाधिकारी बर्थ डे पार्टीत व्यस्त असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. भाजपाच्या लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या या दुटप्पी भूमिकेमु़ळे स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

कोणाचे होते बर्थ डे सेलिब्रेशन

शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जांगीड इस्टेट जवळील सेंटपॉल शाळेसमोर असलेल्या आलिशान मंडपात हे बर्थ डे सेलिब्रेशन सुरु होते. भाजपचे नगरसेवक आनंद मांजरेकर यांचा थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या या वाढदिवसाला मिरा-भाईंदरमधील भाजपचे आमदार, महापौर, नगरसेवक आदी उपस्थित होते.

‘भाजपचं हेच का देशप्रेम?’

शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना हेच का तुमचे देशप्रेम? असा सवाल उपस्थित केला आहे. एकीकडे देश शोकाकूल वातावरणात असताना त्याच विभागतले नगरसेवक आनंद मांजरेकरांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत. तुमच्या विभागात एवढी मोठी घटना घडली असताना देखील भाजपच्या लोकप्रतिनिधींना गांभीर्य नाही अशी टीका प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत