शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर

शिक्षक भारतीची मागणी मान्य ;18 जूननंतर होणार निवडणूक होण्याची शक्‍यता

 
मुंबई : रायगड माझा

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चार मतदारसंघातून विधानपरिषदेवर पाठवून देण्यासाठी 8 जून रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूकीदरम्यान अनेक मतदार सुट्टीमुळे बाहेरगावी जात असल्याने ही निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. ही मागणी आयोगाने मान्य केली असून आता या निवडणूका 18 जूननंतर होणार असून तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर या चार जागांसाठी 8 जून रोजी निवडणूक घेण्याचे निवडणूक आयोगाने घोषित केले आहे. मात्र जून महिन्यात सुट्टी असते. बरेचसे मतदार हे बाहेरगावी गेलेले असतात. मुंबई तसेच अन्य शहरांत हीच स्थिती असते. 2006 साली देखील असाच प्रकार घडला होता. 8 जून 2006 ला निवडणूक जाहीर करण्यात आली होती.

त्यावेळीही शिक्षकभारतीने दिल्लीत जाऊन निवडणूक आयोगाला वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानंतर तारीख बदलून 24 जून 2006 रोजी निवडणूक घेण्यात आली होती. आता देखील शिक्षकांची हीच अपेक्षा होती. त्यामुळे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी दिल्लीत भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्‍त ओमप्रकाश रावत यांना निवेदन दिले व तारीख पुढे ढकलण्याची मागणी केली.

शाळा, कॉंलेज सुरू झाल्यावर निवडणूक घ्या! 
शाळा 15 ते 18 जूनच्या दरम्यान सुरू होतात. त्यामुळे 8 जून रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील मतदार परत येणे हे अशक्‍य असते. कारण आरक्षणेही आधीच करण्यात आलेली असतात. त्यामुळे शाळा, कॉलेज सुरू झाल्यानंतरच ही निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी शिक्षक भारतीने केली होती.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत