शिवजयंतीच्या उत्साहात दिल्लीही दुमदुमणार तर किल्ले सिंधुदुर्गवर शिवरायांचा जयघोष

(रायगड माझा ऑनलाईन)

आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्सव जोरदार साजरा होतोय. राज्यात अनेक ठिकाणी आज भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. किल्ले शिवनेरीवरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित झालेत. तर सिंधुदुर्गातही अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. आपल्या अराध्य दैवताला अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आजच्या दिवशी पहायला मिळतोय.

शिवजयंतीच्या निमित्तानं नवी दिल्लीत आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या संसदेतल्या पुतळ्याला पुष्पाहार अर्पण केला जाईल. त्यानंतर 10 वाजता महाराष्ट्र सदनात शिवजन्मोत्सव सोहळा व शाहिरी कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मुख्य कार्यक्रमात मान्यवर शिवमूर्तीस अभिवादन करतील. 7 वाजता शिवछत्रपतींच्या जीवन चरित्रावर आधारीत “शिवगर्जना या महानाट्याचा प्रयोग पार पडेल.

मराठी साम्राज्याची समुद्रातली राजधानी म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर या वर्षी अखिल भारतीय शिवजन्मोत्सव समितीतर्फे शिवजयंती जल्लोषात साजरी केली जातेय. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर याच सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. इथल्या शिवराजेश्वर मंदिरात महाराजांची पंचधातूंची उत्सव मुर्ती भेट दिली जाणाराय.

तसंच सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. महाराजांच्या याच ठशांच्या चांदीच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही प्रतिकृती शिवराजेश्वर मंदिराला भेट दिल्या जाणार आहेत. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर दिवसभर मर्दानी खेळ, ढोल-ताशा पथकांचे वादन, इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचं व्याख्यान देखिल आयोजित करण्यात आलंय. त्यामुळे आज दिवसभर अवघ्या देशात ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोषणा घुमतोय.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत