शिवदुर्ग प्राणी मित्र संस्था-लोणावळा यांचे काम अतुलनीय

जखमी कुत्र्यांवर इलाज करताना दिसली अनोखी भूतदया.

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या व्हाट्स ऍप ग्रुपवर शिवदुर्ग प्राणीमित्र – लोणावळाचे सुनिलजी गायकवाड यांचा मेसेज आला कि, आम्ही खोपोलीत पोचतोय, जमल्यास मदतीला या. एका कुत्र्याला वाचविण्याचा प्रयत्न करायचा आहे. भर दुपारी रणरणते ऊन आणि कित्येक किलोमीटर प्रवास करून खोपोलीकरांच्या मदतीला सर्व उपकरणं तसेच रेस्क्यू वाहनांसह पोलचलेल्या टीमने केलेलं आवाहन पाहून मी, अमोल कदम, दर्शन शेडगे त्यांनी दर्शविलेल्या लोकेशनवर पोचलो. विहारी येथे राहणाऱ्या भरत वाघुले यांच्या इमारतीमध्ये एक कुत्रा पिसाळला असल्याची खबर सुनिलजी गायकवाड यानां कोणीतरी दिली होती, त्यानुसार नेमकी काय परिस्थिती आहे आणि त्या नुसार उपाय योजना करायची हा हेतू मानत ठेवून खोपोली शहरातील विहारी येथे टीमसह ते पोचले होते.

आम्ही पोचलो तेंव्हा तेथे स्वतः सुनील गायकवाड, कु. वैष्णवी भांगरे, कु. स्वरूपा देखमुख, विकास मावकर त्या कुत्र्यावर इलाज करण्यात व्यस्त दिसले. त्या कुत्र्याला डॉग कॅचिंग  स्टिकने विकास मावकर यांनी पकडले होते तर खोपोलीतली स्वरूपा हि वैष्णवीला त्याच्यावर इलाज करताना असिस्टंस करत होती आणि सुनिलजी या सर्वांना मार्गदर्शन करत होते. त्या परिसरातल्या अनेक महिला आणि पुरुष त्या ठिकाणी कुतूहलाने ते ऑपरेशन पाहण्यासाठी जमले होते.

मी सुनिलजीना विचारले कि, हा कुत्रा पिसाळला आहे असे सगळ्यांचे म्हणणे होते, तर तुम्ही त्यावर इलाज का सुरु केले आहेत आणि नेमका हा काय प्रकार आहे ? तेंव्हा त्यानी सांगितले कि, कुत्र्यांची आपापसात भांडणं होतात, त्या वेळी ते एकमेकाला चावल्याने झालेल्या जखमेवर माश्या बसतात आणि जंतू संसंर्ग होतो.त्यात काही जखमा अश्या असतात कि त्या कुत्र्यांना चाटून नैसर्गिकरीत्या साफ करता येत नाहीत, माश्यांच्या माध्यमांतून त्या जखमेवर पडलेल्या अळ्या खूप वेगाने  द्विगुणित होत जातात, त्यामुळे जखम चिघळते. एकदा जखम चिघळायला लागली कि कुत्रा बेचैन होतो आणि धावू लागतो, त्याच्या अश्या वागण्याला सगळे तो  पिसाळला असे समजतात. तो कुत्रा जखमेच्या त्रासाने हैराण होऊन इकडे तिकडे पळत असताना आपसूकच लोक त्याला डिवचतात त्यावेळी तो त्यांच्या अंगावर जातो आणि कुत्रा पिसाळला अशी आवई उठते. मात्र त्या कुत्र्याला पकडून त्यावर योग्य वैद्यकीय इलाज तसेच उपचार केले तर आठवडाभरात जखम भरते आणि तो बरा  होतो. तोच प्रकार या कुत्र्याच्या बाबतीत झाल्याचे त्यांनी सांगितले.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या बावतीत असलेली लक्षणं त्यांनी सांगितली कि, तो कुत्रा खाली मान घालून सतत धावत असतो, त्याच्या तोंडातून कायम लाळ  गळत असते आणि तो अचानक कोणाच्याही अंगावर धावून जातो. अश्या कुत्र्याला अन्य कुत्री ओळखतात आणि त्याच्यावर भुंकत असतात त्यामुळे तो कुत्रा अधिक चिडचिडा  होतो त्यांना चावतो आणि रेबीजचा प्रसार होतो.  या कारणे आक्रमक झालेल्या कुत्र्याला  हाताळताना त्या जाळी टाकून रेस्क्यू करणं, त्याची पुनर्वसन आणि संगोपन केंद्रात नेऊन त्याची जपणूक करणं, हा एवढाच इलाज असतो. कारण एकदा रेबीजची  बाधा झाली कि, तो कुत्रा जास्त दिवस जगत नाही हे ठरलेलं असतं. पिसाळलेल्या कुत्र्याच्या दंशाने बाधित झालेल्या जनावरांची देखील अश्याच स्वरूपाची लक्षणं  असतात अशी त्यांनी माहिती दिली.

विहारी परिसरातल्या त्या जखमी कुत्र्यावर इलाज करताना कु. वैष्णवी आणि स्वरूपा अगदी झोकून देत काम करत होत्या. त्या कुत्र्याला विकासने कॅचिंग स्टिकने जखडुन ठेवले होते त्याच्या तोंडावर पट्टी बांधली होती. एखाद्या शहाण्या मुलाने गपगुमान व्हावं, तसा तो कुत्रा निपचित पडून होता आणि वैष्णवीला सहकार्य करत होता. सुरक्षेची आणि वैद्यकीय साधनं वापरून एक एक त्याला झालेल्या जखमेतून शेकडो अळ्या ती बाहेर काढत होती. सुनिलजी आणि विकास हि तर या आणि अश्या ऑपरेशन मध्ये मुरलेली माणसं आहेत, मात्र जीचं हसण्या खेळण्याचे आणि मित्र मैत्रिणीत रमण्याचे वय आहे ती वैष्णवी त्या कुत्र्याच्या जखमेतून अळ्या बाहेर काढताना गुंग झाली होती जणूकाही आपल्या जिवलग व्यक्तीवर ती इलाज करत असल्याची भावना तिच्या मनात असावी एवढेच नव्हे तर स्वरुपा देखील  वैष्णवीला मदत करणं आपलं कर्तव्य आहे याच मानसिकतेने मदत करत होती. या सगळ्यांचे काम पाहून वाघुले वाहिनी आणि उपस्थित सर्वच जण अवाक झाले होते. भूक तहान विसरून जवळजवळ दोन ते अडीच तास इलाज सुरु होता. शेवटी त्या कुत्र्यावर यथासांग उपचार करून त्याला पुढे कसे हाताळायचे याचे मार्गदर्शन केल्या नंतर शिवदुर्गची टीम लोणावळ्याला रवाना  झाली होती.

“रात्रंदिवस आम्हां एकची ध्यास, सर्वांना सुखी पाहण्या घेतो आम्ही श्वासं” असा संकल्प घेऊन दररोज सामाजिक सेवेचा वसा घेऊन कित्येक टास्क निशुल्क  पूर्ण करणाऱ्या शिवदुर्गाच्या सुनिलजी गायकवाड आणि टीमचे करावे तितके कौतुक कमीच आहे. वैष्णवी आणि स्वरूपाचे एक वेगळे रूप पहायला  मिळाले. त्यांच्या मनात असलेल्या  मातृत्वाची भावना प्रत्येक कृतीतून दिसत होती.  या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या टीमचे खोपोलीच्या नगराध्यक्षा सौ सुमनताई औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेटे, आरोग्य सभापती सौ प्रमिला सुर्वे, स्थानिक नगरसेवक किशोर पानसरे यांनी आभार मानले.

या जगात अशीही माणसं  आहेत की जी दुसऱ्यांसाठी नव्हे तर मुक्या प्राण्यांसाठीही अहोरात्र धडपडतात,  मग अश्या प्रेरणास्रोतांचा आदर्श घेताना त्यांचे कार्य कानोकानी पोचावे म्हणून केलेला हा शब्द प्रपंच.

_गुरुनाथ साठेलकर 

(अपघातग्रस्तांसाठी मदतसाठी सामाजिक संस्था)

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत