शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला पाच कोटींचा धनादेश प्रदान

पुणे:रायगड माझा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कात्रजजवळील शिवसृष्टी थीम पार्कसाठी केंद्र शासनाच्या वतीने पाच कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. याबाबतचा धनादेश केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी बाबासाहेब पुरंदरे व महाराजा शिव प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांच्याकडे सूपूर्द करण्यात आला.

गडकरी म्हणाले, पुरंदरे यांच्या शिवसृष्टीसाठी पाच कोटी रुपयांचा धनादेश जाहीर करण्यात आला होता. त्याप्रमाणे त्याची पूर्तता शनिवारी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरील वडगाव ते कात्रज दरम्यानचा उड्डाणपूल व सहापदरी रस्त्यासाठी 116 कोटी रुपये मंजूर करण्यात येत आहे. सदर भागातील वाहनांची वाढती संख्या आणि लोकसंख्या याचा विचार करता उड्डाणपूल होणे गरजेचे असून त्यादृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसृष्टी पर्यंत येणाऱ्या पर्यटकांना सुरळितरित्या पुढील काळात येण्याकरिता हा रस्ता उपयोगी ठरेल.

याप्रसंगी पुरंदरे व कदम यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील विविध प्रसंग शिवसृष्टीच्या माध्यमातून अनुभवता येतील. महाराजा शिव प्रतिष्ठान तर्फे कात्रज आंबेगाव परिसरात 21 एकर जागेत 302 कोटी रुपयांचा शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज 15 हजार पर्यटक याठिकाणी भेट देऊ शकतील. 1999 साली याकरिता पुणे शहराबाहेर जागा घेण्यात आली होती व सन 2006 पासून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. आतापर्यंत सर्वसामान्यांचे मदतीतून 40 कोटी रुपयांचे कामाची उभारणी झाली आहे. तसेच ‘जाणता राजा’ प्रयोगाच्या माध्यमातून ही मदतनिधी उभारणी केली जात असून आतापर्यंत या नाटकाचे 1250 प्रयोग झालेले आहे. चार महिन्यांपूर्वी या शिवसृष्टीला राज्यशासनाच्या वतीने ‘मेगा टुरिझम’चा दर्जा देण्यात आल्याने त्यादृष्टीने पायाभूत साेयीसुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

बावधनची शिवसृष्टी अद्याप कागदावरच
राज्यसरकार तर्फे पुणे शहरातील बावधन परिसरात बीडीपीच्या जागेवर 50 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत अद्याप पुढील कोणती हालचाली झालेल्या नाहीत. तर शासनाच्या वतीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या खासगी शिवसृष्टीला पर्याटनाचा दर्जा देण्यासोबतच आर्थिक मदत दिल्याने यापुढील काळात राजकीय वादविवाद होण्याची चिन्हे आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत