‘शिवसेना-भाजपची विचारधारा सारखीच’-देवेंद्र फडणवीस

 

रायगड माझा वृत्त

‘शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे सन २०१९च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका युती करून लढविल्या जातील’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस सरकारला चार वर्षे पूर्ण होत असून, त्यानिमित्त एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. युतीबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘कितीही मतभेद असले तरी शिवसेनेसोबत भाजपची युती होईल. लोकसभा व विधानसभा निवडणुका आम्ही एकत्रच लढवू आणि पुन्हा केंद्रात आणि राज्यात युतीचे सरकार येईल’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘अयोध्येतील राममंदिराचा मुद्दा शिवसेनेने उचलला आहे. करसेवकांनी सन १९९२मध्ये या मंदिराचा पाया रचला. त्या जागेवर भव्य मंदिर उभारायचे आहे. अयोध्येच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपचे एकमत आहे. ते पुढाकार घेत असल्यास चांगली गोष्ट आहे. आम्ही लोकशाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणारे आहोत. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राममंदिराचा प्रश्न सुटेल’, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘काँग्रेसची चिंता नाही’
‘काँग्रेस पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न बघत आहे. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ अशी काँग्रेसची अवस्था आहे. १५ वर्षांत महाराष्ट्रात काय दिवे लावले, किती भ्रष्टाचार केला, हे जनता विसरलेली नाही, त्यामुळे त्यांची आम्हाला चिंता नाही’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत