शिवसेना भाजपमध्येच रंगणार सामना

 

डहाणू : रायगड माझा

2014 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच डहाणू, जव्हार नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांसोबत लढले. पालघर जिल्ह्यात 2014  ची लोकसभा निवडणूक सोडल्यास जिल्ह्यात गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती केवळ नावापुरतीच दिसली. त्यामुळे एकमेकांना राजकीय शह देण्यासाठी राज्यातील सत्तेचे भागिदार पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतही आमनेसामने आले आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्येच चुरस रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.

पालघर जिल्हा परिषद बांधकाम सभापतीपद शिवसेनेच्या हाताशी न लागू देता बहुजन विकास आघाडीला देण्यात आले. तसेच सेनेला देऊ केलेले समाजकल्याण सभापतीपद ऐनवेळी भाजपने काढून घेतले. जिल्हा परिषदेत अडीच वर्षानंतर अध्यक्षपद देता आले असते. मात्र, ते देखील सेनेला मिळवून दिले नाही. डहाणू पंचायत समिती सभापती, उपसभापतीच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला बाजूला ठेवून बहुजन विकास आघाडीला मिळवून देेणे पसंत केले. जिल्हा नियोजन निवडणुकीत भाजप सेनेकडे 9 मते असताना प्रकाश निकम यांना पाडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून दिले. प्रकल्पस्तरीय कमिट्या, शासकीय कमिट्यांवर भाजपने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची वर्णी लागू दिली नाही. ठिकठिकाणी उपसमित्या  शिवसेनेला मिळू नये असाच कायम प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेनेने वाडा नगर पंचायत, जव्हार नगरपरिषद, विक्रमगड नगर पंचायत काबीज करून दाखवले.

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेला भाजपकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळे शिवसेनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी  हतबल झाले. जिल्ह्यापुरती तरी युती तोडावी अशी मागणी त्यांनी पक्षप्रमुखांकडे केली होती. त्याचे पडसाद पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत पाहायला मिळाले. युती होवो न होवे, तरी भाजपवर कुरघोडी करण्याची एकही संधी शिवसेनेकडून सोडली जात नाही. तर, कसेही वागले तरी शिवसेना शेवटी आपल्याबरोबर येणार याची भाजपच्या  नेत्यांना पक्की खात्री झाली आहे. जिल्ह्यात युतीची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गरज भासल्यास इतर पक्षांच्या सहकार्याने आपल्याला पाहिजे तशी धोरणे भाजप राबवत आहे. आणि निवडणुकांनंतर पुन्हा युती करण्याचे धोरण राबवले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात युती नावापुरती असून एकमेकांना खाली खेचण्याचे धोरण जिल्ह्यात दिसत आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघ युतीच्या जागा वाटपात भाजपकडे जातो. त्यामुळे शिवसेनेला या जागेवर दावा करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला आपला दावा टिकवण्याची संधी मिळाली आहे.

2004 च्या पालघर विधानसभा निवडणुकीत सेनेच्या मनिषा निमकर 58,627, तर काँग्रेसचे राजेंद्र गावित यांना 50,186 मते मिळाली होती. यामध्ये शिवसेना आणि काँग्रेसमध्ये 8500 मतांचा फरक होता. 2009 च्या निवडणुकीमध्ये राजेंद्र गावित 55,665, मनिषा निमकर यांना 34,694 आणि अपक्ष उमेदवार शंकर नम यांना 32000 मते मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कृष्णा घोडा यांना 46,142 मते, तर काँग्रेसच्या राजेंद्र गावित यांना 45,527 मते मिळाली. केवळ 515 मतांनी घोडा यांचा विजय झाला. भाजपच्या डॉ.प्रेमचंद गोंड यांना 34,149 मते मिळाली होती.

कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पालघर विधानसभेच्या जागेवर 2016 मध्ये झालेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने सेना उमेदवार कृष्णा घोडा यांचे पुत्र अमित घोडा यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत अमित घोडा 18,948 च्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांना 67,129 मते मिळाली होती.तर राजेंद्र गावित यांना 48,181 मते मिळाली होती. मनिषा निमकर (बविआ) यांना 36,781 मतांवर समाधान मानावे लागले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.