शिवसेना- राष्ट्रवादी राजकीय वादात दियाचा बळी? 

रायगड : माणगावमध्ये राजकीय वादातून सात वर्षांच्या चिमुरडीची हत्या?

माणगाव : रायगड माझा वृत्त 

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सात वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून  राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.  चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दिया जाईलकर या सात वर्षांच्या मुलीचा मृतदेह अखेर सापडला असून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. या हत्येच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) माणगावमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

माणगावमधील वावे गावात राहणारी  दिया जाईलकर ही मुलगी २५ मेला संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास दुकानातून काही वस्तू आणायला घराबाहेर पडली होती. मात्र बराच वेळ झाला तरी दिया घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात दिया बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली.

सोमवारी संध्यााकाळी साडे सातच्या सुमारास दियाचा मृतदेह गावातीलच बंद घरात सापडला. वावे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दियाची आई नुतन जाईलकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या. मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणाही होणार होती. या निवडणुकीच्या रागातूनच दियाची हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

दियाच्या हत्येच्या निषेधार्थ माणगावमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी बंदची हाक दिली आहे. माणगाव, गोरेगाव, निजामपू, इंदापूर, लोणेरे या गावांमधील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. राजकारणाने इतकी खालची पातळी गाठल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वावे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

शिवसेना- राष्ट्रवादी राजकीय वादात दियाचा बळी? 
वावे या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी अशा दोन राजकीय पक्षांत वर्चस्वासाठी लढाई सुरू होती. दियाची आई नुतन जाईलकर या शिवसेना पक्षाकडून बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामुळे या गावात राजकीय वाद विकोपाला गेला होता. राजकीय वैमनस्यातूनच दियाचे अपहरण करुन तिची हत्या करण्यात आली असावी असा संशय आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत