शिवसेना सोबत असो वा नसो, तयारीला लागा : मुख्यमंत्री

 

मुंबई :रायगड माझा

शिवसेनेशिवायही निवडणूक स्वबळावर जिंकणे शक्य असल्याचे पालघर लोकसभा पोटनिवडणुकीने दाखवून दिले, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईत आज भाजप प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

यापुढे शिवसेनेला सोबत घेण्याचा प्रयत्न करु. मात्र भविष्यात शिवसेना भाजपसोबत असो, वा नसो पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शिवसेनेने एकत्र यावं, असं आवाहन केले. समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी आमचे प्रयत्न आहेत. मात्र एका पक्षाने युती होत नाही. शिवसेनेने एकत्र यायला हवे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

राज्यात दोन लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या. मात्र पालघरमध्ये आम्ही सर्व विरोधक एकत्र असताना निवडून आलो. देशात भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यावं यासाठी हालचाली सुरु आहेत, असंही दानवे म्हणाले.

दरम्यान, राज्यात होणारी भाजपची पिछेहाट पाहता, राज्यात भाजपने हालचाली वेगवान केल्या आहेत. आगामी विधानपरिषद निवडणूक आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी राज्य भाजपने आज मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या. पहिली बैठक आज सकाळी 11 वाजता दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयात झाली.

महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर रात्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर भाजप मंत्र्यांची बैठक होईल. या बैठकांमध्ये राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुका, आगामी विधानपरिषद निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेने स्वबळाच्या घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर, भाजपनेही आता स्वबळच्या चाचपणीसाठी कंबर कसली आहे. एकंदरीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने हालचाली वेगवान केलेल्या आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत