शिवसेनेचा डाव फसला, उल्हासनगरमध्ये भाजपाच्या पंचम कलानी महापौरपदी

ठाणे : रायगड माझा वृत्त

उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पंचम कलानी यांचा विजय झाला आहे. कलानी यांचा पराभव करण्याचे विरोधकांचे मनसुबे उधळून लावण्यात भाजपाला यश आले आहे. १९९०च्या दशकात राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावरून पप्पू कलानीच्या विरोधात भाजपा नेत्यांनी आकाश-पाताळ एक केले होते. त्याच कलानीच्या सुनेला भाजपाने आता महापौरपदी बसवले.

उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी शुक्रवारी निवडणूक झाली. साई पक्षाच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळालेल्या भाजपाच्या अडचणी साई पक्षाच्याच सात बंडखोर नगरसेवकांनी वाढवल्या होत्या. या बंडखोर नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवार उभा करत शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे महापौरपदाच्या दावेदार असलेल्या कलानी कुटुंबाच्या आणि भाजपच्या पायाखालची वाळू सरकली होती.

महापौरपद हे भाजप आणि त्यातही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनले होते. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आणि इतर विरोधी पक्षांच्या मदतीने विरोधी गटाच्या नगरसेवकांची संख्याही ३८ पर्यंत पोहोचत असल्याने भाजपच्या चिंतेत वाढ झाली. अखेर शुक्रवारी या पदासाठी निवडणूक झाली.

बंडखोर नगरसेविकेने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पंचम कलानी यांची महापौरपदी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याने शिवसेनेला हादरा बसला. भाजपाला शह देण्याचा शिवसेनेचा डाव फसला असून शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची दांडी मारली असून साई पक्षात सारे काही आलबेल होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत