शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी उपसभापती पदाची ऑफर

नागपूर : रायगड माझा

आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा शिवसेनेने घेतलेला पवित्रा, तसेच राज्यातील नाणार, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनला होणारा विरोध लक्षात घेऊन भाजपाने आपल्या मित्रपक्षाची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने शिवसेनेला विधानपरिषदेच्या उपसभापती पदाची ऑफर दिली आहे. ही ऑफर स्वीकारायची किंवा नाही, हे सर्व शिवसेनेवर अवलंबून असून ही प्रक्रिया विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात होणार असल्याची माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांने सोमवारी दिली.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 16 जुलैला नागपूरमध्ये निवडणूक होत आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर सभागृहात भाजप-शिवसेनेचे संख्यबळ वाढणार आहे. त्यामुळे सभागृहातील बहुमताच्या जोरावर शिवसेनेचा उपसभापती बसविण्याचे भाजपने ठरवले आहे. या निवडणुकीत उमेदवाराला निवडून येण्यासाठी 25 मते आवश्‍यक आहेत.

विधानसभेतील पक्षनिहाय संख्याबळ लक्षात घेता भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन, कॉंग्रेस-राष्ट्रवादी दोघांचे मिळून तीन उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यास निवडणूक चुरशीची होणार आहे. शिवसेनेने अतिरिक्त मतांच्या बळावर तिसरा उमेदवार दिल्यास 11व्या जागेसाठी शिवसेना, कॉंग्रेस आघाडी आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात लढत होईल.

विधान परिषदेच्या या निवडणुकीनंतर विधानपरिषदेत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरणार आहे. या संख्याबळाच्या आधारे भाजप उपसभापती पदावर दावा सांगणार आहे. माणिकराव ठाकरे यांची मुदत संपत आल्याने उपसभापती पदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती भाजपच्या या मंत्र्यांने दिली. तर शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल परब, मिलिंद नार्वेकर, कॉंग्रेसकडून माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे, बाबाजानी दुराणी, तर शेकापकडून जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

विधान परिषदेतून निवृत्त होणारे सदस्य 
राष्ट्रवादी कॉंग्रेस 
सुनील तटकरे
अमरसिंह पंडित
जयदेव गायकवाड
नरेंद्र पाटील

कॉंग्रेस 
माणिकराव ठाकरे
शरद रणपिसे
संजय दत्त

भाजप
भाई गिरकर
महादेव जानकर

शिवसेना 
अनिल परब

शेकाप 
जयंत पाटील

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत