शिवसेनेच्या सत्तेनंतरही मालमत्ता कर माफीबाबत ठोस निर्णय नाही

मुंबई : महाराष्ट्र News 24 वृत्त

पाचशे फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कराबाबत असलेल्या अनिश्चित धोरणामुळे महापालिका करसंकलन खाते संभ्रमात आहे. थकीत कराची बिलेही मालमत्ता धारकांना यामुळे वेळेत पाठवलेली नाहीत. त्यामुळे मालमत्ता करात मोठी घट होण्याची शक्यता आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी पालिकेने करधारकांसाठी सुरु केलेल्या ‘अर्लीबर्ड इन्सेन्टिव्ह योजने’ अंतर्गत महिनाभरात कर भरणाऱ्यांना टक्के सवलत देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शिवसेनेनं वचननाम्यात दिलेल्या वचनानुसार पाचशे स्के.फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करतांना केवळ सर्वसाधारण कर माफ की संपूर्ण मालमत्ता कर शंभर टक्के माफ करायचा यावर अजूनही ठोस शासननिर्णय झालेला नाही. या संभ्रमामुळे, मालमत्ता कराची हजारो देयके महापालिकेकडून देण्यातच आली नाहीत. मालमत्ता कराची वसूली रखडल्यानं महापालिकेच्या महसूलात मोठी घट आली आहे.

मालमत्ता कर माफी धोरणाचा संभ्रम काय

जकात कर हा महापालिकेचा महसुलाचा मुख्य स्रोत होता. मात्र 2017 मध्ये जकात बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा महापालिकेचा महसुलाचा मुख्य स्त्रोत राहिला आहे. मात्र, 2017 च्या महापालिका निवडणुकीत 500 चौरसफुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने जाहीर केली. तत्कालीन फडणवीस सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या आधी शासनाने 500 चौरस फुटांपर्यंच्या सदनिकांना सर्वसाधारण कर न आकारण्याचा अध्यादेश (10 मार्च 2019) जारी केले. मात्र, मालमत्ता करातील केवळ सर्वसाधारण कर माफ की संपूर्ण मालमत्ता कर माफ यामुळे अंमलबजावणी बाबत संभ्रम निर्माण झाला.

सव्वादोन लाख देयके अडकून

पाचशे चौरस फुटांपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या सदनिकेला करसवलत देण्यासाठी धोरणातील संभ्रमामुळे, २ लाख २० हजार देयके विहित कालावधीत पाठविणे शक्य झाले नाही. त्यामुळे ती देयके दुसऱ्या सहामाहीत पाठविण्या येणार आहेत. कराची रक्कम वेळेत भरू इच्छिणाऱ्या सदनिकाधारकांना अर्ली बर्ड सवलतीमध्ये एक महिन्याच्या आत देयक भरणाऱ्यांना चार टक्के तर दोन महिन्याच्या आत देयक भरणाऱ्यांना दोन टक्के सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या सवलती अंतर्गत करनिर्धारण व संकलन खात्याने 15 कोटी 24 लाख 54 हजार 234 रुपयांची तरतूद केली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत