शिवसेनेत मंत्रीपदावरून  संघर्ष तीव्र …. 

शिवसेनेच्या जेष्ठ मंत्र्यांविरुद्ध  तरुण आमदारांचा बंडाचा इशारा 

मुंबई :  रायगड माझा 

लोकांमधून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांमध्ये टोकाचा असंतोष धुमसत आहे. मंत्रिपद आम्हाला न देता विधान परिषदेच्या सदस्यांना दिली आहेत, ते आमची कामे करत नाहीत, नाराज आमदारांना नेतृत्वही विश्वासात घेतले जात नाही, अशा त्यांच्या तक्रारी असून, त्यांचा एक गट बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार असल्याचे वृत्त आहे.

गेले अनेक दिवस शिवसेना आमदारांमध्ये हा असंतोष धुमसत आहे.
मंत्रिपदे व महामंडळावरील नियुक्ती मिळणार नसेल तर नागपूर अधिवेशनाला जायचे तरी कशाला? असा संतप्त सवालही या आमदारांनी केला. पक्षनेतृत्व स्बळाची भाषा करत असताना त्या भूमिकेलाच काही आमदारांनी सुरुंग लावला आहे. न्याय मिळणार नसेल तर आम्ही पक्षबांधणी कशी करायची व मतदारसंघ सांभाळायचे कसे? अशी उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली आहे.
स्वतंत्रपणे लढण्याची भाषा परवडणारी नाही. तसे केल्यास आम्हाला मतदारसंघातून निवडून येणे अवघड आहे. मात्र, निवडून न येणारे काही नेते मातोश्रीवर जाऊन चुकीची माहिती देतात, असेही काही  आमदारांचे म्हणणे आहे.
डॉ. दीपक सावंत यांना विधान परिषेदेची उमेदवारी दिली नसली तरी त्यांचे मंत्रिपद कायम आहे. त्यांना आणखी ६ महिने मंत्रीपदी कायम ठेवण्याचे घाटत आहे. तसे झाल्यास आमच्या निवडून येण्याला अर्थ नाही, असे सांगून पश्चिम महाराष्ट्रातील  एक आमदार म्हणाला की, त्या जागी विधानसभा सदस्याला संधी दिली पाहिजे.
विधान परिषद सदस्यांना मंत्रीपदे देताना आम्हाला सांगितले की, निवडणुकीच्या एक वर्ष आधी त्यांचे राजीनामे घेऊन विधानसभेतील आमदारांना
मंत्री पदे दिली जातील. पण ते होताना दिसत नाही. सेनेचे मंत्री मातोश्रीपेक्षा ‘वर्षा’वर जास्त निष्ठा दाखवतात. मातोश्रीवरील बैठकांची माहितीही ‘वर्षा’वर कळवण्यात धन्यता मानतात. आम्ही निष्ठेने मतदारसंघात शिवसेना बांधत आहोत, पण आम्हाला कोणी विचारत नाही. महामंडळाच्या नेमणुकाही चार वर्षे झाली तरी केल्या जात नाहीत.
येत्या आठवड्यात  काही आमदारांची बैठक होणार आहे. मंत्रिमंडळात व महामंडळांत विधानसभा सदस्यांना सामावून न घेतल्यास नागपूरला जाणार नाही आणि ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांना आमचा मानस बोलून दाखवू. पण घुसमट सहन करणार नाही, असे या आमदारांनी बोलून दाखवले.
 शिवसेना आमदारांमध्ये जर  ही अस्वस्थता असेल तर त्यामगे केवळ मंत्रिपद हे एकमेव कारण नाही तर यामागे भाजपची धूर्त रणनीती आणि त्याला शिवसेनेतूनच मिळणारी रसद कारणीभूत आहे . हे  जर समजूनही  त्याकडे  शिवसेनेचे नेतृत्व  डोळेझाक करणार असेल  तर शिवसेनच्या पराभवासाठी विरोधकांची गरज नाही हे मात्र नक्की 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत