शिवसेनेने फक्त राजकारण करुन जनतेची फसवणूक केली : नारायण राणे

रत्नागिरी : रायगड माझा वृत्त 

शिवसेनेने फक्त राजकारण करुन जनतेची फसवणूक केली. निवडून आल्यावर वीस वर्षात काय बदल झाले, ते काहीच करु शकले नाहीत. सिंधुुदुर्ग जिल्हा परिषदेला पुरस्कार आणि इकडे दिवाळखोरी अशी स्थिती आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हेच गणित शिवसेनेसह अन्य पक्षाचे आहे, असा आरोप करीत खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमान हाच पर्याय असल्याचे आवाहन रत्नागिरीत केले.

 

येथील विवेक हॉटेलच्या मैदानावर झालेल्या स्वाभिमानच्या पहिल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले की रत्नागिरी जिल्हा दरडोई उत्पन्नात बावीसाव्या क्रमांकावर आहे. जीडीपी काय आहे, सर्व समाजांची हालाखीची स्थिती आहे, मच्छीमारांचे परिस्थिती गंभीर झालीय, कधी भाव असतो तर कधी भरपाई मिळत नाही. आंब्याचीही तिच स्थिती आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणून आंबा-काजू बोर्डाला शंभर कोटी मंजूर केले. सत्ता गेल्यावर निधी मिळालाच नाही. येथील मंत्री, खासदार, आमदार करतात काय. राजीनामा खिशात घेऊन फिरणारे वाघ या प्रश्‍नावर ते बाहेर का काढत नाहीत. शिवसेना फक्त राजकारण करतेय, असा आरोप त्यांनी केला.

श्री. राणे म्हणाले, रत्नागिरी जिल्हा परिषदेची अवस्था दयनिय झालीय. सव्वा वर्षांनी अध्यक्ष बदलतो. काय विकासाची कामे राबवणार. येथे लुटमार, ठेकेदारी वाढलीय. दर्जेदार कामे होत नाहीत. स्वतःच मंत्री आणि नातेवाईक ठेकेदार. काम बिघडले तर तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्‍नच आहे. महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य आहे. काय करतात येथील आमदार, खासदार का नाही बोलत सभागृहात. रत्नागिरीचे काही मंत्री मंत्रीमंडळात आहेत; मात्र मुख्यमंत्री त्यांना भेट देत नाहीत. राणे मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणून मातोश्रीवर शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. यावरुनच शिवसेनेच्या मंत्र्यांची ताकद दिसते, असेही राणे म्हणाले.

नीलेश राणे उच्चशिक्षीत आहेत; मात्र दोनदा मॅट्रीक नापास झालेल्यांना निवडून दिले. हा पराभव जिव्हारी लागला आहे. भविष्यात नीलेश यांच्या मागे उभे राहा. 

 

निवडणुका जवळ आल्या की वचने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांच्यासह सत्तेत नसलेले मनसेचाही समावेश आहे. यामध्ये स्वाभिमान वेगळी धोरणे घेऊन पुढे येत आहे. शब्द देऊ तो पुरा करु असे आमचे घोषवाक्य आहे. त्यावरच आम्ही आगामी निवडणुकीत पुढे जाणार आहोत, असेही खासदार राणे म्हणाले.

…तर महिन्यात आरक्षण

मराठा आरक्षणासाठी तोडफोड, जाळपोळ सुरु आहे. तरुण आत्महत्या करताहेत. हे समजताच मुख्यमंत्र्यांना भेटलो. मराठा आरक्षण दिलेच पाहीजे, अशी मागणी केली. यामुळे महाराष्ट्राच नाव खराब होत आहे. हे थांबले पाहीजे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले मागासवर्गीय आयोगाने अहवाल दिला तर एक महिन्याच्या आत आरक्षण देईन. आरक्षण मिळावे या मताची शिवसेना नाही. सगळे उठले म्हणून शिवसेना त्यात पडली असा आरोप त्यांनी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत