शिवसेनेमध्ये भाजपला अडचणीत आणण्याबाबतची रणनीती तयार

मुंबई : रायगड माझा वृत्त 

सत्तेचा आधार घेत दुसऱ्या पक्षातील आमदारांना ‘आकर्षित’ करण्याच्या भाजपच्या रणनीतीला शह देण्यासाठी शिवसेना नेतृत्वाने विशेष खबरदारी घेतली असून, विश्वासातील सर्व पदाधिकाऱ्यांना भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्याचे कळते. फोडाफोडीबाबत काही गंभीर गोष्टी पुढे आल्यास भाजपला अडचणीत आणण्याबाबतची रणनीतीही शिवसेनेमध्ये ठरविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

राज्यात सन २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जवळपास सर्वच पक्षांनी सुरू केली असून, भाजपही त्यात आघाडीवर आहे. पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी अन्य पक्षांतील आमदारांशी भाजपच्या नेत्यांनी संपर्क साधणे सुरू केल्याचे कळते. यात प्रामुख्याने शिवसेनेच्या आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी निवडणुकीसाठीचा आवश्यक तो खर्च देण्याचे गाजर समोरच्यांना दाखविण्यात येत आहे. शिवसेनेच्या निष्ठावान आमदारांनी याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून माहिती दिल्याचे कळते. निष्ठावान आमदार कोणत्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नसल्याचे पक्षनेतृत्वाला सांगत आहेत; मात्र ज्या आमदारांची पुन्हा निवडून येताना दमछाक होण्याची शक्यता आहे असे आमदार गप्प राहून परिस्थितीचा शेवटपर्यंत अंदाज घेऊ शकतात. शेवटच्या वेळी अशा आमदारांनी पक्ष सोडल्यास पक्षाची अडचण होईल हे गृहित धरून शिवसेना नेतृत्वाने भाजपची ही रणनीती गांभीर्याने घेतल्याचे कळते.

भाजपमधील ‘नाराजां’नाही हेरा!

पक्षाचे संपर्कप्रमुख आणि विश्वासातील काही पदाधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना देण्यात आली असून, त्यांना त्यांचे ‘जाळे’ अधिक मजबूत करण्यास सांगण्यात आल्याचे कळते. प्रसंगी भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन फोडाफोडीबाबतची माहिती मिळविण्याची सूचनाही त्यांना देण्यात आल्याचे कळते. त्याचबरोबर, विश्वासातील पोलिस अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यास या पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे कळते. आपल्या आमदारांना एकत्रित ठेवतानाच भाजपला चाप लावण्यासाठी त्यांच्यातील नाराज आमदारांशी संपर्क साधण्यासह सांगितले गेले आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचा मजबूत उमेवार नाही, अशा ठिकाणी विरोधी पक्षातील मजबूत उमेदवारांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे कळते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत