शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल; प्रवीण दरेकरांचा इशारा 

शिवसेनेला याची किंमत मोजावी लागेल ...

महाराष्ट्र News 24 वृत्त

गणेशोत्सवाच्या बाबतीत शिवसेनेनं दुटप्पीपणाची भूमिका घेतल्यामुळं जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल,’ असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळं मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी असलेल्या कोकणवासीयांना गावची ओढ लागली आहे. गावी पोहोचण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. मात्र, करोनाची साथ आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांच्या प्रवासात अनेक अडथळे येत आहेत. ई पास, क्वारंटाइनबाबत राज्य सरकारनं ठोस कुठलीही भूमिका न घेतल्यानं संभ्रम वाढला आहे. वारंवार मागणी करूनही एसटी गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत. त्यातच कोकणातील गावागावांत नवनवे नियम बनवले जात आहेत. लोकांना प्रवेश देण्यावरून गोंधळ सुरू आहे.

 हे सगळं सुरू असतानाच रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं आहे. कोकणात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळं गरज असेल तर गणपतीसाठी कोकणात या, असं त्यांनी म्हटलं आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून कोकणात येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाइनचा नियम पाळावाच लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. राऊत यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवीण दरेकर यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

विनायक राऊत यांचं वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचं आहे. एका बाजूला भावना आणि दुसरीकडे वास्तव आहे. ज्या कोकणी जनतेच्या भावनेवर स्वार होऊन शिवसेनेनं राजकीय यश मिळवलं. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढवली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला आता शिवसेना पायदळी तुडवत आहे. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल,’ असा संताप दरेकरांनी व्यक्त केला आहे. आता शिवसेना याबाबत काय भूमिका स्पष्ट करते हे पहाणे महत्वाचे ठरेल.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत