‘शिवसेनेशी माझे संबंध संपले”; हर्षवर्धन जाधव यांचा पक्षाला जय महाराष्ट्र

औरंगाबाद : रायगड माझा वृत्त 

Related image

मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. काही दिवसांत नवीन पक्ष काढतोय, त्यामुळे आता माझा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पक्ष माझ्यावर कारवाई करणार किंवा काय निर्णय घेणार, हा प्रश्नच नाही, असे सांगून शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्याचे मंगळवारी जाहीर केले.

महाराष्ट्रात आतापर्यंतच्या राजकारणामुळे सामाजिक विषमता तयार झाली आहे. ती विषमता मिटविण्यासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करावा काय, याचे चिंतन करण्यासाठी मी तापडिया नाट्य मंदिरात चिंतन बैठक बोलावली होती. बैठकीत अठरा पगड जातींच्या प्रतिनिधींनी मते मांडली. त्यानंतर नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून महिनाभरात पक्ष नोंदणी होईल, दोन ते चार दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

आ. जाधव म्हणाले, न्हावी, माळी, कोळी, धनगर, दलित, राजपूत, ठाकूर, वंजारी, मुस्लिम या प्रत्येक समाजाला त्रास होतो आहे. उत्तम पर्याय म्हणून नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचे सर्वांनी सुचविले आहे. मराठा समाजासाठी पक्ष स्थापन करण्याबाबत मी बोललो होतो; परंतु कालांतराने मला समजले की, मराठा समाज आणि इतर समाजांचे देखील सारखेच प्रश्न आहेत. मला सर्वंकष जाणीव झाली की, राज्य सरकारने सर्व समाजांसमोर प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन पक्ष काढण्याचे ठरविले. धुळे, नंदुरबार येथील जि.प. निवडणूक पक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत न बोलण्याच्या सूचना
शिवसेनेचे आमदार असल्यामुळे पक्षाकडून दबाव येऊ शकतो, यावर आ. जाधव म्हणाले, शिवसेनेने जी काही धोरणे घेतली आहेत, ती पटलेली नाहीत. मराठा आरक्षणावर बोलायचे नाही, अशी सूचना करण्यात आली. ते मला थोडेसे पचले नाही. इतर काही धोरणे आहेत तीदेखील पटलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर आता थांबायचे नाही, असे ठरविले.

बॅकफूटवर जाणार नाही
माझ्या वतीने शिवसेनेशी काही संबंध राहिलेला नसल्यामुळे मी बॅकफूटवर जाणार नाही. माझे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत चांगले संबंध आहेत, ते आगामी काळातही राहतील. सरकारने मराठा आरक्षण दिले तरी मी राजीनामा परत घेणार नाही, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे हीदेखील माझी मागणी आहे.

बायको म्हणाली रिकामा धंदा…
बायकोची (संजना जाधव) व्यथा समजत आहे. सासरे भाजपचे नेते आहेत. बायको सांगून थकली की, पक्ष काढण्याचा रिकामा धंदा करू नका. शेवटी वैतागून म्हणाली, ठीक आहे. जसे करायचे तसे करा. मी प्लास्टिकचा बॉल आहे. कुठेही बुडवा वर येणारच, त्यामुळे मला बुडविण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शिवसेनाप्रमुखांना  ४० वर्षे लागले पक्षाचा मुख्यमंत्री बनविण्यासाठी. त्यांचं जमलं, आज ना उद्या आपलंही जमेल. पक्षाला पैसे नव्हे तर माणसे लागतात. हिंदुत्व खतरे में म्हणून ‘गध्याला’ मतदान करा हे कुणी सांगितले. मुस्लिमांची भीती दाखविण्याचे किडे डोक्यात कुणी घातले, असा सवालही आ. जाधव यांनी यावेळी केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत