शिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणारी बोट बुडाली, एकाचा मृत्यू

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेलेली स्पीड बोट बुडाली

रायगड माझा वृत्त | मुंबई

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या शुभारंभासाठी गेलेल्या स्पीड बोटीला अपघात झाला असून अपघातानंतर ही बोट समुद्रात बुडाली आहे. यामुळे शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. तसेच बचावकार्यासाठी दोन हेलिकॉप्टर आणि अन्य दोन बोटी रवाना झाल्या आहेत. या अपघातात सिद्धेश पवार नावाचा एक युवक बेपत्ता आहे. दरम्यान, एका बोटीत एक मृतदेह आढळून आला असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. बोटीत २५ जण होते. त्यातील २४ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

शिवस्मारकाच्याजवळ असताना दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही स्पीड बोट खडकाला धडकली, त्यानंतर ही बोट बुडाली. गिरगावजवळील समुद्रात खडकाला बोट धडकल्याने हा अपघात झाला. ज्या बोटीला अपघात झाला आहे, त्यामध्ये 25 जण होते, इतर सर्वजण सुखरूप आहेत मात्र एक जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिद्धेश पवार हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती आपत्कालीन यंत्रणेने दिली आहे. तटरक्षक दलाची दोन हेलिकॉप्टर बचावासाठी घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसंच दोन बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. याशिवाय अग्निशमन दलाचे जवानही किनाऱ्यावर पोहोचले आहेत.

बहुचर्चित शिवस्मारकाच्या उभारणीला आजपासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार होती. शिवस्मारक उभारणीचे कंत्राट “एल ऍण्ड टी’ म्हणजेच लार्सेन आणि टुब्रो कंपनीला दिले आहे. खरंतर प्रत्यक्ष बांधकाम 12 मार्च 2018 रोजी सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ते आतापर्यंत सुरू झाले नव्हते. आज कुठे स्मारकाच्या उभारणीला सुरूवात होईल असं वाटत असताना स्पीड बोट बुडाल्यामुळे शिवस्मारकाची पायाभरणी आजही रद्द करण्यात आली आहे.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने शिवस्मारकाची संकल्पना मांडत घोषणा केली होती. त्यानंतर, स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकीय प्रवासात रखडला होता. अखेर शिवसेना-भाजपा युती सरकार सत्तेत आल्यानंतर स्मारकासाठी आवश्यक परवानग्या मिळवत स्मारकाचे जलपूजन झाले आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत