शिवाजीराव देशमुख हे लोकप्रिय नेते – रामराजे

मुंबई – रायगड माझा वृत्त

‘‘विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख जनमानसातील लोकप्रिय नेते होते. राजकारण, शिक्षण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत त्यांचा वावर असायचा,’’ अशी भावना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेत सोमवारी व्यक्त केली.

सभापतींनी माजी सदस्य कृष्णराव पांडव यांच्याही निधनाबद्दल आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत आदींनीही देशमुख यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. विधान परिषदेत हा शोकप्रस्ताव एकमताने मंजूर झाल्यानंतर सभागृहात दोन मिनिट मौन पाळून देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली.

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना विधान परिषदेत शोकप्रस्तावाद्वारे आदरांजली वाहण्यात आली.

तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून गिरीश व्यास, सुभाष झांबड, अब्दुल्ल खान दुर्राणी, डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती जाहीर केली. तसेच, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शंभूराज देसाई, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, हर्षवर्धन सकपाळ आणि सुधाकर देशमुख यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत