शिवाजी महाराजांचा वापर अत्तरासारखा नको, ते रक्तात भिनायला हवेत

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली भावना!

रायगड माझा वृत्त | 

माझ्या बालपणी घरची परंपरा आणि रीतिरिवाज संस्कारक्षम होते. वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींमधून छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजत गेले. नुसते समजलेच नाहीत तर रक्तात भिनले. आजच्या काळात अनेकजण शिवाजी महाराजांचा वापर केवळ अत्तरासारखा लावून फिरण्यासाठी करतात, मात्र शिवाजी महाराज ही अत्तरासारखी लावायची नव्हे तर रक्तात भिनण्याची गोष्ट आहे, अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी व्यक्त केली.

राजहंस प्रकाशनाच्या विस्ताराला या वर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राजहंस ग्रंथवेध या राजहंस प्रकाशनाच्या गृहपत्रिकेचा विस्तार विशेषांक बुधवारी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. राजहंस प्रकाशनाचे संस्थापक या नात्याने बाबासाहेबांनी गप्पांमधून राजहंसी दिवसांच्या मोरपंखी आठवणी जागवल्या. ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

बाबासाहेब म्हणाले, गंगाधर राजहंस या माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मित्राच्या नावावरून प्रकाशन संस्थेला राजहंस हे नाव द्यायचे ठरवले. दख्खनची दौलत हे राजहंस प्रकाशनाच्या मुद्रेसह प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होते. यानंतर राजहंस प्रकाशन हळूहळू मोठे होत गेले. दिलीप माजगावकरांच्या कारकिर्दीत राजहंस खऱ्या अर्थाने मोठे झाले. आजच्या घडीला राजहंस प्रकाशनाचे स्थान हे राज्यातील सवरेत्कृष्ट प्रकाशकांमध्ये सर्वात वरचे आहे. श्री. ग. माजगावकर यांचे माणूस साप्ताहिक दीर्घकाळ उत्तमपणे चालले. मात्र त्याची कारकीर्द प्रदीर्घ होऊ शकली नाही याबद्दलची खंत बाबासाहेबांनी यावेळी बोलून दाखवली.

शिवचरित्र लिहून ते प्रकाशित करणे हे आव्हान होते, पण कोथिंबिरीच्या जुडय़ा विकण्यापासून पडतील ते कष्ट केले. हातून शिवचरित्र लिहिले जावे हा एकच ध्यास त्या मागे होता. मात्र त्या काळात एकाच वेळी मित्राकडून फसवले जाण्याचा आणि परक्यांकडून न मागता मदत मिळण्याचा अनुभव मी घेतला. शिवचरित्र प्रकाशित झाले तेव्हा आचार्य अत्रे यांनी मराठामध्ये त्यावर अग्रलेख लिहिला. त्यातून शिवचरित्र सर्वांपर्यंत पोहोचले आणि त्याची पहिली आवृत्ती वेगाने विकली गेल्याची आठवणही बाबासाहेबांनी यावेळी सांगितली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत