शेकापचे जेष्ठ नेते आणि जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम पेमारे यांचे निधन

नेरळ : कांता हाबळे 

कर्जत तालुक्यातील मानिवली गावात राहणारे शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस तथा विद्यमान रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम पेमारे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास निधन झाले. पेमारे यांचे निधन झाल्याने शेतकरी कामगार पक्षाचे मोठे नुकसान झाले असून एक गरिबांचा कैवारी हरपला असल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण रायगड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 
सुदाम पेमारे हे शेतकरी कामगार पक्षाकडून सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. 2006 पासून ते 2017 पर्यंत शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस होते. 2012 साली त्यांनी कर्जत तालुक्यातील खांडस जिल्हा परिषद विभागातून निवडणूक जिंकून ते जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी या भागात कोट्यवधींची विकासकामे केली. ही कामे करत असताना  खांडस विभागात शेतकरी कामगार पक्ष भक्कम केला होता. त्यामुळे पुढील निवडणूक विकास कामांच्या जोरावर निवडून येणार असा त्यांना विश्वास होता. त्यामुळे 2017 साली नव्याने स्थापन झालेल्या कळंब जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली. आणि ते पुन्हा जिल्हा परिषद सदस्य झाले.
गेली 6 वर्ष ते जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य होते. व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचेही सदस्य होते. शेतकरी कामगार पक्षात सक्रिय नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिलायन्सच्या विरोधात आंदोलन सहभाग, गोर- गरिबांना मदत करणे, अंध-अपंग व्यक्तती, गरजू विद्यार्थी यांना ते नेहमीच मदत करत असत. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर त्यांनी अनेक ग्रामपंचायती व संपूर्ण खांडस विभागात शाळेचे बांधकाम, पाणी योजना, रस्ते, सभामंडप, विहिरी अशी कोट्यवधींची विकास कामे केली. त्यामुळे मोठा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी उभा होता . 
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत