शेकापच्या बालेकिल्ल्यात मनसेची जोरदार मुसंडी; वहाळ व मोरावे गावातील शेकडो ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश

पनवेल : साहिल रेळेकर (प्रतिनिधी)

शेकापचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणाऱ्या वहाळ व मोरावे गावाच्या हद्दीत मनसेने देखील आपला झेंडा रोवला आहे. या दोनही गावातील शेकडो ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काल प्रवेश केला. यात अनेक महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश आहे. वहाळ आणि मोरावे याठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल मनसेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कोरोनामुळे राजकीय हालचाली मंदावल्या होत्या परंतु पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात हालचालींना वेग येऊ लागलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील नव्या जोमाने ठीकठिकाणी पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व असलेल्या वहाळ व मोरावे या दोन्ही गावात राज ठाकरे साहेबांवर विश्वास ठेऊन मनसेत प्रवेश केलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असे आश्वासन मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी दिले. तसेच कोणत्याही मनसैनिकाला कधीही रात्री अपरात्री कोणतीही समस्या भासल्यास त्याठिकाणी सर्वप्रथम मनसे मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही असेही जिल्हाध्यक्ष अतुल भगत म्हणाले.

कोरोनाच्या काळात सर्वाधिक लोकांच्या मदतीला मनसे धावून गेली व अजूनही हॉस्पिटल किंवा अन्य ठिकाणी मनसेने घेतलेले लोकसेवेचे व्रत अविरतपणे सुरूच असल्याची प्रतिक्रिया यादरम्यान मनसैनिकांकडून व्यक्त करण्यात आली.

यावेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांच्यासह मनसे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रवीण दळवी, खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष ऍड. अक्षय काशीद, नवीन पनवेल उपशहराध्यक्ष यतीन देशमुख, पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष गोंधळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत