अमरावती : रायगड माझा वृत्त
ई-क्लास जमिनीवर तीस पस्तीस वर्षांपासून शेती करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांनी शेतातच अधिकाऱ्यांसमक्ष विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना वाशीम जिल्ह्यात घडली. मानोरा पोलिस ठाण्याचे हद्दीत भोईनी गावात शुक्रवारी (ता. तीन) या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली.
नर्मदा उत्तम धवने (वय 50), उत्तम भिकाजी धवने (वय 60), अन्नपूर्णा देवराव धवने (वय 60) व देवराव भिकाजी धवने (वय 65) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत. प्रकृती गंभीर असल्यामुळे चौघांनाही सायंकाळी उपचाराकरिता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तम धवने यांचा मुलगा शशांक व मिलिंद हे दोघेही आईवडील व काका-काकूंच्या उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आले असता, त्यांनी ही माहिती दिली. मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून दोन्ही भावाचे कुटुंब भोईनी गावातील ई-क्लास जमिनीवर शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शशांक व मिलिंद यांच्या मते सन 2007 मध्ये महसूल विभागाने त्यांना या ई-क्लास जमिनीवर शेती करण्यासाठी जागेचे मोजमाप करून दिले होते, असे त्यांनी सांगितले. सद्य:स्थितीत त्यांनी शेतात तूर, सोयाबीनचे पीक घेतले.

अतिक्रमण काढण्यासाठी दबाव
9 जुलै 2018 रोजी ग्रामपंचायत कार्यालयाने नोटीस न देता, काही जनावरे शेतात सोडून नुकसान केले. अतिक्रमण काढण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने जुनी कारवाई खरी दाखविण्यासाठी जुन्या तारखेला नोटीस बजावल्याचे दाखविले. त्या आधारावर शुक्रवारी (ता.तीन) पोलिस, ग्रामपंचायत कार्यालय आणि महसूल विभागाचे पथक शेतातील अतिक्रमण हटविण्यासाठी आले. त्यामुळे द्विधा मन:स्थितीत असलेल्या धवने कुटुंबातील चौघांनी अधिकाऱ्यांसमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. चौघांनाही प्रथम कारंजा येथील ग्रामीण रुग्णालयात व तेथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.