शेतकऱ्यांचा अपमान देश सहन करणार नाही: राहुल गांधी

“तुम्ही आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात टाकला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता”

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान करु नये. शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता, असे सांगून मोदी त्यांचा अपमान करत आहे. शेतकऱ्यांचा हा अपमान आता देश सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील सभेत काळा पैशावरुन काँग्रेसला चिमटा काढला होता. काही लोक गादीखाली पैशे ठेवून झोपायचे, कोणी घरातील भांड्यात पैसे ठेवायचे, कोणी गोणीत तर कोणी गहूखाली पैसे लपवून ठेवायचे, असे त्यांनी म्हटले होते. नोटाबंदीचे समर्थन करताना त्यांनी हे विधान केले होते.

राहुल गांधी यांनी ही व्हिडिओ क्लिप शेअर करत नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांचा दाखला देत मोदींवर निशाणा साधला. ‘तुम्ही कधी विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी यांना गहूचे पिक घेताना पाहिले आहे का?, तुम्ही आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात टाकला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता. शेतकऱ्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी शुक्रवारी देखील मोदींवर टीका केली होती. ‘नरेंद्र मोदी येतात आणि 15 लाखाचं आश्वासन देतात. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन देतील. पण आपल्या भाषणात गेल्या साडे चार वर्षात किती तरुणांना रोजगार दिला यासंबंधी एकही शब्द उच्चारणार नाहीत. मोदींनी उद्योजकांचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांने ते कर्जमाफी देत नाही’, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत