शेतकऱ्यांना मालकाचे स्थान मिळावे – राजू शेट्टी

गोंदवले : रायगड माझा वृत्त 

‘‘शेतीप्रधान भारताचा खरा मालक शेतकरी आहे. त्याला पुन्हा मालकाचे स्थान प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान शेती व्यवस्थेपुढे आहे,’’ असे मत खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

किरकसाल (ता. माण) येथे दीपावलीनिमित्त आयोजित विचारांचा दीपोत्सव कार्यक्रमात ‘बदलत्या काळातील शेती व शेतकरी’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना शेट्टी बोलत होते. त्या वेळी उद्योगपती रामदास माने, आयकर विभागाचे उपायुक्त महेश शिंगटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष तानाजी देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्‍ते अनिल पवार, संदीप मांडवे, दिलीप आवळे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘उद्योग क्षेत्रात उत्पादन होणाऱ्या मालाला किंमत मिळते. मात्र, शेतकऱ्यांच्या मालाला कमी किंमत दिली जाणाऱ्यांचा चंगळवाद शासनाकडून जोपासला जात आहे. हा चंगळवाद पोसण्यासाठी निसर्गाची खोडी दुसऱ्यांनी काढली; परंतु त्याची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना भोगावी लागत आहे. शेतीबाबत सरकारने ठरविलेल्या धोरणात वेळोवेळी बदल न केल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. वातावरणातील प्रदूषण रोखण्याचे जगापुढे मोठे आव्हान असताना ज्यांच्यामुळे ही वाढ होत आहे, ते मूग गिळून गप्प आहेत. शेतकऱ्यांना मात्र झाडे लावण्याचे उपदेश केले जातात. हवामान बदलाची माहिती मिळविण्यासाठी उच्च तंत्रज्ञान वापरून शेतकरी सक्षम केला जातो. आपल्याकडे मात्र तसे कोणतेही प्रयत्न होत नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी गुलामांना जन्माला घातले पाहिजे, अशी अर्थव्यवस्था सध्या देशात तयार होत आहे.’’

रामदास माने, महेश शिंगटे, तानाजी देशमुख, संदीप मांडवे, अनिल पवार यांचीही भाषणे झाली. या वेळी आदर्श शेतकरी व उद्योजकांचा सत्कार केला. अमृता काटकर हिने प्रास्ताविक केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले.

दीपोत्सवाचा प्रारंभ
दरम्यान, ‘ग्रामविकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असून, ती कधीच परिपूर्ण होऊ शकत नाही,’ असे मत माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. आदर्श गाव किरकसाल (ता. माण) येथे ग्रामपंचायतीतर्फे विचारांचा दीपोत्सव व सत्कार कार्यक्रमाची सोमवारी रात्री सुरवात झाली. त्यात पहिले पुष्प गुंफताना श्री. दळवी बोलत होते. डॉ. बी. जे. काटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रदीप पोळ, विनोद मोहिते, अप्पासाहेब देशमुख, उपसरपंच सुखदेव चव्हाण उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत