श्रावणी सोमवार निमित्ताने हरिहरेश्वरला गर्दी; अभिषेक व दर्शनासाठी साठी भाविकांच्या रांगा 

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

राज्यातील लाखो शिवभक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या दक्षिण काशी श्री क्षेत्र हरिहरेश्वर ला आज श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी (ता 13) भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली.  पावसातही आज दिवसभरात शेकडो भाविक दर्शनासाठी उपस्थित होते.

श्रावण महिन्यात हि संख्या वाढत जाते. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने पहाटे 4 वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी सुरु झाली. दिवस भर मध्येमध्ये पावसाच्या सरी सुरु असूनही भाविकांची रिघ वाढतच होती. आजच्या पवित्र दिवशी देवावर अभिषेक करण्यासाठी मोठी रांग पहायला मिळाली.  भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवु नये यासाठी देवस्थान कमिटिचे अध्यक्ष वामन बोडस, सचिव सिद्धेश पोवार, पदाधिकारी व पोलीस पाटील विनोद भोसले जातीने लक्ष ठेवून होते. संध्याकाळी उशीरा पर्यंत येथे गर्दी पाहायला मिळाली.

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे ठिकाण “दक्षिण काशी” म्हणुन ओळखले जाते. एका बाजुला हरिहरेश्वराचा डोंगर तर दुसर्‍या बाजुला निळाशार समुद्र यामुळे तीर्थाटन आणि पर्यटन असे दोन्हीही होतात. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी चार मंदिरे तसेच समुद्रकिनारी असणारे विष्णुपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. कर्नाटकातील गोकर्ण ते ठाणे जिल्ह्यातील निर्मळ हे पाचशे मैलांचे दक्षिणोत्तर अंतर व 48 मैल रुंद एवढा प्रचंड परिसर हा श्री क्षेत्र हरिहरेश्वराचा परिसर मानण्यात येतो. सावित्रीला दिलेल्या वराप्रमाणे ब्रह्मदेवाने सावित्रीसह यज्ञ केला. या हरिहरेश्वर क्षेत्राच्या दक्षिण दिशेला व उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. देशात ऐकूण 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आहे असे मानले जाते. हरिहरेश्वरचा महापवित्र क्षेत्र असा उल्लेख ‘श्री हरीहरेश्वर माहात्म्य’ पोथीमध्ये आहे. हरिहरनावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरुप या दोन्हींचा संगम झाला आहे. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. शंकर व पार्वती यांचे एकत्रित दर्शन घेण्यासाठी उभयतांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याची माहिती सचिव सिद्धेश पोवार यांनी दिली. या क्षेत्रात ज्या चार टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. मंदिर जरी समुद्र किनार्‍यावर असले तरी प्रदक्षिणा मार्ग डोंगरा वरुन व समुद्रा मधुन आहे. कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान आहे.

या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. या क्षेत्राला नयनरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे येथे भाविक पर्यटकांची गर्दी मोठया प्रमाणावर पाहायला मिळते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत