श्रीगोंद्यात प्रांताधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

वाळूमाफियांची वाढली मुजोरी; मारहाणीनंतर वाहनांच्या काचा फोडल्या

रायगड माझा वृत्त

श्रीगोंदे – अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्यावर कुऱ्हाडीने वार करण्याचा प्रयत्न करीत वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास बनपिंप्री शिवारात हा प्रकार घडला. याप्रकरणी दानेज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, श्रीगोंदे तालुक्‍यात वाळूमाफियांची मुजोरी वाढली असून त्यांना मिळत असलेल्या राजाश्रयामुळे त्यांची हिंमतदेखील आता वाढली आहे.
याबाबत दानेज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की सरकारी वाहनाने अवैध वाळूतस्करी विरोधात कारवाईसाठी रविवारी दुपारी वाहन चालक नामदेव तांदळे, मंडलाधिकारी विलास आजबे आणि कामगार तलाठी ऋषिकेश खताळ यांच्यासह आपण आढळगाव परिसरात भेट दिली. आढळगाव-हिरडगाव रस्त्यावरील कोकणगाव शिवारात चोरट्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवर कारवाई केली. त्याच वेळी सीना नदीपात्रात चवरसांगवी येथे एक डंपर बेकायदा वाळूवाहतूक करीत असल्याचे समजले. सोलापूर-नगर रस्त्याने नगरच्या दिशेने चालले असताना बनपिंप्री शिवारात एक डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना दिसला. त्याला हॉर्न देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो वेगात पुढे गेला.


पठारेवस्तीजवळ चालकाने डंपर थांबवून रस्त्यातच वाळू खाली केली. मागून जाणारी दानेज यांची गाडी त्या वाळूत फसली. दानेज यांनी स्वतःची ओळख सांगून डंपरचालकास नाव विचारले असता त्याने सुनील दिलीप पठारे असे सांगितले. त्या डंपर चालकाकडे वाळूवाहतूक परवाना नसल्याने रीतसर कारवाई करणार असल्याचे दानेज यांनी सांगितले. डंपरचालकाने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मोठ्याने शिवीगाळ केली. त्याने त्याच्या नातेवाइकांना बोलावून घेतले. काही वेळात दोन महिला आणि चार पुरुष त्या ठिकाणी आले. त्या पुरुषांच्या हातात लोखंडी सळई, कुऱ्हाड अशी हत्यारे होती. त्यापैकी एकाने दानेज यांना जीवे ठार मरण्याच्या उद्देशाने डोक्‍यात कुऱ्हाड मरण्याचा प्रयत्न केला. मात्र, दानेज यांनी चपळाईने जीव वाचवला; परंतु कुऱ्हाड सरकारी वाहनाच्या मागच्या काचेवर लागून काच फुटली. सरकारी वाहन चालक तांदळे यांनादेखील एका व्यक्‍तीने मारहाण केली.
कामगार तलाठी खताळ आणि मंडलाधिकारी आजबे यांनाही लथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तेथे आलेल्या महिलांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. डंपरचालक व त्याच्या नातेवाइकांनी प्रांताधिकारी दानेज व सहकाऱ्यांच्या दिशेने दगडफेक केली. तुम्ही आमच्या वाळूच्या गाड्या पकडता, आम्ही तुम्हाला गोळ्या घालून ठार मारून टाकू, अशी धमकी दिली. प्रांताधिकारी दानेज व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याच जागी डांबून ठेवण्यात आले. डंपर (क्र.एम एच 16 ए ई 6535) चा चालक व त्याचे नातेवाइक तेथून पळून गेले. दरम्यान, दानेज व त्यांच्या सहकाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज तहसील कर्मचाऱ्यांनी बंद पाळून निषेध व्यक्‍त केला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत