श्रीवर्धन पंचायत समितीची इमारत रखडली; श्रीवर्धन मधील जुन्या इमारतीत कर्मचारी व जनतेची  गैरसोय.

श्रीवर्धन : श्रीकांत शेलार

श्रीवर्धन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ग्रामविकास मंत्रालयाने दोन कोटी दहा लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देवून बांधकामास हिरवा कंदील दिला. मात्र  चार वर्षांपासून धुळखात पडलेल्या प्रस्तावास युती सरकारने लक्षही दिले नाही शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील कानाडोळा केला आहे. 
श्रीवर्धन पंचायत समितीची सध्या अस्तित्वात असलेली प्रशासकीय इमारत गेले कित्येक वर्षा पूर्वी बांधण्यात आली आहे. येथील सरासरी पर्जन्यमान जास्त असल्याने सध्याच्या इमारतीला गळती लागून ती जीर्ण झाली आहे. त्याबरोबरच पंचायत समितीच्या सध्याच्या इमारतीमध्ये सर्व विभागांना पुरेशी जागा नसल्याने कार्यालयीन कामकाजासाठी ही इमारत अपुरी पडत होती. तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामीण भागातील नागरिकांना कामानिमित्त पंचायत समितीच्या कार्यालयात नेहमी यावे लागते, मात्र जागा अपुरी असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधींची एखादी बैठक घेण्यासाठी जागाच नसते. त्यावेळी मात्र ग्रामसेवक, आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण या विभागांच्या कर्मचाऱ्यांना बाहेर उभे राहावे लागते.  पंचायत समितीला नवीन प्रशासकीय इमारतीची आवश्यकता आहे.
प्रशासकीय इमारतीची गरज ओळखून आ. सुनील तटकरे  यांनी नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचा प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना श्रीवर्धन पंचायत समिती प्रशासन व जिल्हा परिषद बांधकाम विभागास दिल्या होत्या. तसा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव श्रीवर्धन पंचायत समितीने 3 जुलै 2014 रोजी पारित केला होता. 9 सप्टेंबर 2014  रोजी इमारत बांधण्यास प्रशासकीय मान्यता  मिळाली होती. इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी जिल्हा परिषदच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देण्यात आली होती.श्रीवर्धन मधील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पंच्यात समितीच्या कार्यालयाची निर्मिती प्रस्तावित होती त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पण मान्यता दिली होती. मात्र गेली चार वर्षांपासून महसूल व जिल्हा प्रशासनाच्या वादात इमारतीचे बांधकाम रखडले आहे.
पंचायत समितीची नवीन इमारत मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत घेण्याचे ठरले होते. त्यानंतर ते तांत्रिक मंजुरी साठी अधीक्षक अभियंता कडे मंजुरी साठी गेले असता, पहिल्या मजल्यावर प्रांताधिकारी कार्यालय असल्याने इमारतीच्या देखभालीची व दुरुस्ती कोण करणार यांमुळे पुढील कार्यवाही रखडली आहे. 
– के वाय बारदेस्कर, प्रभारी कार्यकारी अभियंता – अलिबाग. 
प्रस्तावित सुसज्ज इमारतीत : 
नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामध्ये अद्ययावत सोई सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. संगणक प्रणाली, संरक्षक भिंत, रेन हॉर्वेस्टींग व फायर फायटिंग, अपंगांसाठी रेलिंग  आदी सुविधांचा त्यामध्ये समावेश आहे. श्रीवर्धन तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामामुळे जनतेची कामे जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत