संकट आणणाऱ्यांना बडवा – राज ठाकरे

पुणे : रायगड माझा वृत्त

‘‘जेवढ्या जोराने ढोलताशा बडवत आहात. तेवढ्याच ताकदीने महाराष्ट्रावर जे कोणी संकट आणतील त्यांनाही बडवा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ढोलताशा पथकांना दिला. मनसे आयोजित ‘स्वरराज’ ढोलताशा करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गणेश भोकरे, नीलेश हांडे, मंदार बलकवडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट याप्रसंगी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोलताशा पथकांपैकी शिवसाम्राज्य पथकास प्रथम, तर समाधान पथकास द्वितीय व रुद्रतेज पथकास तृतीय पारितोषिक देऊन ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

ठाकरे म्हणाले, ‘‘ढोलताशा वादकांमध्ये आणि आमच्यामध्ये एकच साम्य आहे. ते म्हणजे बडवणे हे होय. ढोलताशाचा आवाज ऐकल्यावर सर्वांनाच आनंद होतो. ढोलताशा वादनाची जुनी परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र संगीतकार अजय-अतुल यांनी या कलेला महत्त्व प्राप्त करून दिले. त्यांना श्रेय  दिले पाहिजे.’’

पालकमंत्र्यांचा भाववाढीत हात नाही
‘‘पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्यामुळे उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. मात्र या भाववाढीत गिरीश बापटांचा काहीही हात नाही. त्यांच्यामुळेच ढोलताशा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला शनवारवाड्याचे प्रांगण मिळाले आहे.’’ राज ठाकरे यांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेले हे मत ऐकून पालकमंत्री क्षणभर अचंबित झाले. त्यानंतर त्यांनीही उपस्थितांना हात जोडून दिलखुलास दाद दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत