संगीतकार शंकर यांचा पियानो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यात सामील

पुणे : रायगड माझा ऑनलाईन 

हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील शंकर यांचा वैयक्तिक पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यात सामील करण्यात आला आहे. संगीतकार शंकर यांचे नातू  संतोषकुमार यांनी शंकर यांचा हा पियानो राष्ट्रीय चित्रपटसंग्रहालयाला देणगीदाखल बहाल केला. ज्याच्या स्वरांमुळे असंख्य गाणी श्रवणीय आणि अजरामर झाली तो संस्मरणीय पियानो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिन्यात समाविष्ट झाल्याबद्दल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी आनंद व्यक्त करताना संतोषकुमार तसेच हा पियानो राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल संदीप आपटे यांचे आभार मानले आहेत.

शंकर-जयकिशन यांच्या अनेक गाण्यांमध्ये पियानोचा सुरेख वापर 

“ शंकर-जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहे . विशेषतः राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी आणि मुकेश व लता मंगेशकर यांच्या बरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला. ही गाणी असंख्य चित्रपट रसिकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली. शंकर जयकिशन यांच्या अनेक गाण्यांमध्ये पियानोचा सुरेख वापर करण्यात आलेला आहे . त्यामुळे शंकर यांचा पियानो अर्काइव्हमध्ये जतन करण्यास मिळणे याचे विशेष महत्व आहे “, असे प्रकाश मगदूम म्हणाले.

सुमारे ९० वर्षांपूर्वीचा जुना पियानो 

जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा जुना आहे. ‘स्कीडमायर ‘ कंपनीच्या या  ‘अप्राईट पियानो’मध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या (चाव्या) आहेत.

या दोघांचाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव 

 ‘रिदम’, ‘मेलडी’ आणि ऑर्केस्ट्रेशन यांचा सुमधुर मिलाप करण्यात हातखंडा असलेले संगीतकार शंकर-जयकिशन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य संगीतकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या असंख्य लोकप्रिय गाण्यांनी १९५०, १९६० आणि १९७० अशी तीन दशके रसिकांच्या मनावर गारूड निर्माण केले होते. १९६८ साली भारत सरकारने शंकर-जयकिशन या दोघांचाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत