‘संजय’चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा ; भाजपचा संजय राऊतांवर हल्लाबोल

मुंबई : रायगड माझा वृत्त 

महाभारतातल्या संजयचा रोल फक्त काॅमेंट्री करण्याचा आहे, टीम सिलेक्टरचा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र भाजपच्या आयटी सेलने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाजपने राऊत यांच्यावर ही टीका केली आहे. 

‘संजय’चा रोल फक्त कॉमेंट्री करायचा ; भाजपचा संजय राऊतांवर हल्लाबोल

जे स्वतः चमचेगिरीतुन पुढे आले, ज्यांची स्वतःची नोकरी धृतराष्ट्राच्या आंधळेपणावर अवलंबून आहे, त्यांनी कर्तृत्ववान माणसांच्या खुर्चीची काळजी करू नये…असे बोचरे वक्तव्य भाजपच्या आयटी सेलने ट्वीटमध्ये केले आहे.

मराठा आरक्षणारुन राज्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. काल बंद दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. त्या पार्श्वभूमीवर सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचे नेतृत्व काढून घेतले जाईल अशी भाजपच्या गोटातच चर्चा असल्याचे विधान संजय राऊत यांनी काल काही माध्यमांशी बोलताना केले होते. त्याचा भाजप आयटी सेलने समाचार घेतला आहे. भाजप आयटी सेलने याबाबत केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी ‘व्हेकन्सी’ नसल्याचेही म्हटले आहे.

महाराष्ट्रात जे चित्र आहे, ते राजकीय नेतृत्वाचे अपयश आहे. त्यातूनच मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. मुख्य म्हणजे या चर्चा महाराष्ट्रात रंगलेल्या नसून तर भाजपमध्येच रंगलेल्या आहेत, अशी माझी खात्रीशीर माहिती आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले होते. मात्र, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत