संस्थाचालकाच्या जाचामुळे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

रायगड माझा वृत्त 

वाळूज – रांजणगाव शेणपुंजी येथील महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशन रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) संचालित पुंजाराम महाराज ज्ञानमंदिर विद्यालयाचे शिक्षक महेंद्रसिंग प्रेमसिंग पाटील (३१, रा. नारेगाव, औरंगाबाद) यांनी संस्थाचालकाकडून छळ सुरू असल्याचे कारण पुढे करत शनिवारी सकाळी शाळेचे गेट आतून बंद करत स्वतःला आत कोंडून घेत शाळेच्या तीनमजली इमारतीच्या छतावर चढून ‘मला न्याय मिळाला नाही तर मी खाली उडी घेऊन आत्महत्या करणार’ असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर वाळूज एमआयडीसीचे पोलिस कर्मचारी, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकांकडून पाटील यांची समजूत काढण्यात आल्यानंतर दीड तासाच्या अवधीनंतर पाटील यांनी इमारतीवरून खाली येत शाळेचे मुख्य द्वार उघडले.

रांजणगाव ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असणाऱ्या पी.एम. ज्ञानमंदिर विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करणाऱ्या महेंद्रसिंग पाटील या शिक्षकाने शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत, आतून मुख्य दरवाजा बंद करून स्वतःला आत कोंडून घेत, ते थेट तिसऱ्या मजल्याच्या छतावर चढले. तेथून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशारा उपस्थितांसह व्हॉट्सअॅप ग्रुपवरील सहकाऱ्यांना दिला. बघता-बघता घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान, १०० क्रमांकावर फोनद्वारे या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली.

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या आदेशानुसार सहायक फौजदार नामदेव सुरडकर, पोलिस काॅन्स्टेबल बाळू लहरे व विशेष पोलिस अधिकारी अंबादास प्रधान यांनी तत्काळ शाळेच्या दिशेने धाव घेतली. त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक सेनेचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध कळकुंबे, आदिनाथ अडसरे यांच्यासह गावातील कैलास हिवाळे, दत्तू हिवाळे आदी प्रतिष्ठित नागरिकांसह मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी इमारत परिसरात एकत्र आली होती.

माझ्या अॅप्रूव्हलसाठी संस्थाचालक हेतुपुरस्सर पाठपुरावा करत नाही
मी सन २०१२ मध्ये संस्थाचालक यांना १० लाख व त्यानंतर सन २०१८ मध्ये ८ लाख असे एकूण १८ लाख रुपये शिक्षकाच्या नोकरीसाठी दिले. चालू शैक्षणिक वर्ष जून २०१८ पासून मला शाळेच्या हजेरीपटावर सही न करण्याची ताकीद मुख्याध्यापकाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच सध्या उदरनिर्वाहासाठी मी ऑटोरिक्षा चालवण्याचे काम करत असून मला १७ ऑगस्ट रोजी संस्थाचालक यांनी त्यांच्या घरी बोलावून मी दिलेले पैसे परत घेण्यास सांगितले.

त्यामुळे १८ ऑगस्ट रोजी मी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, असे सांगत वरीलप्रमाणे आरोप पाटील यांनी केले आहेत. यासंदर्भात संस्थाचालकांशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांचे मत कळू शकले नाही.

शिक्षकाचे संस्थाचालकावर आरोप
संबंधित शाळा सन २०१३-१४ पासून २० टक्के पदासाठी डी.एड. ३ पदांकरिता पात्र आहे. मात्र, संबंधित संस्थाचालकाने संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोट्या दस्तएेवजांच्या आधारे तीनच्या जागी दोनच जागा दाखवल्या तसेच डी.एड.च्या जागी पदवीधरची जागा रिक्त असल्याचे दाखवण्यात आले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत