सत्तेत असूनही शिवसेना विरोधकांचं काम का करते? उद्धव ठाकरेंची मॅरेथॉन मुलाखतीत परखड उत्तरे

मुंबई : रायगड माझा वृत्त 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखतीचा पहिला भाग आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये उद्धव यांनी केंद्रातील मोदी सरकारची धोरणं, राष्ट्रीय राजकारण, भाजपाची भूमिका, छत्रपती शिवरायांचं स्मारक, शेतकऱ्यांचं आंदोलन यांसारख्या विविध विषयांवर परखड भाष्य केलं आहे. राजकारणात विश्वासाला खूप महत्त्व आहे, मात्र विश्वासाला जागणारी पिढी आता आहे का? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह या जोडगोळीवर शरसंधान साधलं.

 

उद्धव ठाकरेंची मॅरेथॉन मुलाखतीत परखड उत्तरे

 

विरोधकांचं काम शिवसेना का करते ?
विरोधी पक्ष काय करतायेत हे जनतेनी पाहिलंय. शिवसेना राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्तेत सहभागी आहे हे मी मान्य करतोच. आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत. साथ दिली तीसुद्धा उघडपणे दिली आणि विरोध केला तोही उघडपणेच केला. शिवसेना आज सत्ताधाऱ्यांवर अंकूश ठेवण्याचं काम करतेय. आमच्याकडे मंत्रीपद आहे कारण लोकसभेची निवडणूक आम्ही एकत्र लढलो होतो. त्यावेळी देशामध्ये जो काही कारभार चालला होता आणि आजही काही वेगळा कारभार चाललाय असं मला वाटत नाही, त्यात कुणीतरी बदल करेल अशी देशातील जनतेप्रमाणे आम्हालाही आशा होती. चांगल्या गोष्टी अजिबातच झाल्या नाहीत असे नाही. पण काही गोष्टी गोरगरीब जनतेच्या हिताच्या नाहीत, तिथे सत्तेत असलो तरी आम्ही विरोध करणारच. कारण आम्ही मित्र आहोत ते देशाच्या जनतेचे.
– शिवसेना भारतीय जनतेचा मित्र आहे. कोणत्याही एका पक्षाचा मित्र नाही. म्हणूनच वेळोवेळी एखादी गोष्ट आम्हाला पटली नाही किंवा पटणार नाही, तेव्हा आम्ही बोलतोच. आम्ही सरकारच्या एखाद्या भूमिकेला वा धोरणाला विरोध केला तो देशाच्या, जनतेच्या हितासाठीच.

अविश्वास प्रस्तावावेळी मतदान केलं नाही, सत्तेमध्ये असूनसुद्धा सरकारला मतदान का नाही ?
सरकारला मतदान करायचंच असतं तर इतके दिवस आम्ही सरकारच्या निर्णयावर हल्ला का चढवला असता? आज जे सगळे मिळून बोलताहेत तीच भूमिका शिवसेनेने आधीच मांडली होती. मग नोटाबंदी असेल, जीएसटी असेल, भूसंपादन कायद्याबद्दल असेल, विषय कोणताही घ्या, आज सगळे जण एकत्र बोलताहेत. पण त्या वेळेला याविरोधात बोलण्याचे धाडस फक्त शिवसेनेनेच दाखवलंय. म्हणूनच मी म्हणतो की, सत्तेमध्ये आम्ही आहोत, पण विश्वासदर्शक-अविश्वासदर्शक हा जो काही प्रकार आहे… नेमका कुणी कोणावर विश्वास आणि अविश्वास दाखवायचा? आम्ही विरोधी पक्षात जाऊन सरकारविरोधात मतदान करायचे का? विरोधी पक्षाने तरी असं काय केलं आहे? जेव्हा शिवसेना जनतेच्या विषयांवर आवाज उठवत होती तेव्हा हे पक्ष कुठे होते? गोरगरीबांची विल्हेवाट लावणारी नोटाबंदी केली गेली. मला माहितेय की, दुसऱया की तिसऱया दिवशी एकटय़ा शिवसेनेने देशभरात आवाज उठवला होता. त्या वेळी वातावरण असं होतं की, याविरोधात जो बोलेल तो देशद्रोही. मग शिवसेनेने तेव्हा उचललेले मुद्दे आज सगळे जण घोकताहेत आणि बोलताहेत. माझी मैत्रीची व्याख्या वेगळी आहे. मित्र एखादी गोष्ट चुकत असेल तर ती परखडपणे सांगणारा तो खरा मित्र. वाहवा करणारे, भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही. देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतरही चुकत असेल तर परखडपणे सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार.

शेतकऱ्यांच्या संपाबाबत काय सांगाल
गेल्या वर्षी जेव्हा शेतकऱयांचा संप झाला होता तेव्हा शिवसेना बेधडक शेतकऱयांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरली होती. शेतकऱयांनी संप केला तेव्हा बाकीचे पक्ष शेतकऱयांची बाजू घ्यायला कचरत होते. मुख्यमंत्र्यांनी तर असं जाहीर करून टाकलं होतं की, हा शेतकऱयांचा संप नाही, हे शेतकऱयांचे आंदोलन नाही, त्यात राजकीय पक्षांचा सहभाग आहे, हात आहे. तेव्हा मी ठामपणे सांगितले होतं की, माझा हातच नाही…पाय, डोके सगळे त्याच्यात आहे… सदेह. मी म्हणजे माझा पक्ष शिवसेना हा सदैव आणि सदेह शेतकऱयांसोबत आहे आणि राहील. त्यात मला काही कुणाची भीती वाटण्याचं कारण नाही.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कधी होतंय ?
शिवसेनाप्रमुखांचं एक स्मारक कल्याणमध्ये झालं आहे. दुसरं संभाजीनगरमध्ये होतंय. तिथेही आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे आणि तिसरं मुंबईमध्ये महापौर निवासात होईल. तो जो काही बंगला आहे, किंबहुना ती जी महापौर निवासाची इमारत आहे ती केवळ जागेला जागा म्हणून आम्ही मागितली नव्हती. त्याच्यामागे आमच्या भावना आहेत. याचं कारण शिवसेनेचे आतापर्यंत सगळय़ात जास्त महापौर झाले, ते तिथे राहिले आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या वेळीसुद्धा ज्या अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाच्या बैठका त्या वास्तूत झालेल्या आहेत. समोरच शिवतीर्थ आहे. तिथे शिवसेनाप्रमुखांनी इतिहास घडविला. शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्मारक आहे. म्हणजे दुसरे हिंदुहृदयसम्राट आहेत, म्हणून त्या जागेचे एक महत्त्व आहे. त्यामुळे आम्हाला ते तिथे करायचंय. पण ते करताना खूप काळजीपूर्वक करावं लागतंय. महापौर बंगल्याचं एक महत्त्व आहे. त्यामुळे स्मारक उभारताना ते काळजीपूर्वक उभारावे लागेल. ही वास्तू पाडून स्मारक बांधणे अजिबात शक्य नाही. तिला धक्का न लावता या सगळय़ा गोष्टी करायच्या आहेत. काळजीपूर्वक करावे लागेल. मागे समुद्र आहे. ‘सीआरझेड’ कायद्यामुळे बांधकामासाठी काही बंधने आहेत. ही हेरिटेज वास्तू आहे. त्या हेरिटेजची परवानगी आता गेल्या आठवडय़ात मिळाली आणि आता हे प्रकरण अंतिम मंजुरीसाठी दिल्लीला गेलंय. मी पहिल्याच दिवशी सांगितलं, जोपर्यंत सगळ्या मंजुऱया हातामध्ये येत नाहीत तोपर्यंत या गोष्टीला हात लावणार नाही. कारण काम सुरू झालं आणि एखादी परवानगी अडली असं चालणार नाही.

महाराष्ट्राचे वारे कुठल्या दिशेने वाहताना आपण पाहताय?
वारे कोणत्या दिशेने वाहतात ते काही वेळेला पटकन कळत नाहीत. एक प्रकार असतो ज्याला चक्रीवादळ म्हणतात. जे गोल गोल फिरत जातं. त्यामुळे ते नेमक्या कोणत्या दिशेने चाललंय ते कळत नाही, पण ते येऊन गेल्यानंतर कळतं की, सगळा विध्वंस झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत