सभापतीपदासाठी “फिल्डिंग’

शिक्षण समिती: जगताप-लांडगे गटांमध्ये खलबते

पिंपरी : रायगड माझा 

महापालिकेच्या सत्तेतील वाट्यात महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपमधील आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोन प्रमुख गटांतील इच्छुकांमध्ये आता शिक्षण मंडळ सभापतीपदासाठी जोरदार “फिल्डिंग’ सुरू आहे. त्यादृष्टीने राजकीय खलबते सुरू झाली आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सव्वा वर्षानंतर शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती सदस्यपदी नऊ नगरसेवकांची नेमणूक झाली असून समितीचा पहिला सभापती येत्या सोमवारी (दि.9) निवडण्यात येणार आहे.

शिक्षण समिती सभापती निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी दुपारी 1 वाजता महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक होईल. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासिन अधिकारी म्हणून महाराष्ट्र कृषि विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तत्पूर्वी गुरुवारी (दि.5) दुपारी तीन ते पाच वेळेत सभापतीपदासाठी उमेदवारांचे अर्ज नगरसचिव कार्यालयात स्वीकारले जाणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्याठिकाणी नऊ नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी देण्यात आली. त्यामध्ये भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्विनी चिंचवडे यांचा समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप पहिला सभापती म्हणून कोणाला संधी देणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.