समलिंगी संबंध गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन 

समलिंगी संबंध गुन्हा ठरवणाऱ्या कलम 377 बाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिला.

प्रत्येकाला आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज, प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र ओळख आहे. लोकांना आपली मानसिकता बदलायला हवी. समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने एकमताने निर्णय दिला. LGBT( lesbian, gay, bisexual, transgender) या संपूर्ण कम्युनिटीसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे.

कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत. जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवं. देशात सर्वांना सन्मानाने जगता आलं पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं. समाजाने पूर्वग्रहदूषित विचारधारेपासून मुक्त व्हायला हवं. प्रत्येकाने आकाशात इंद्रधनुष्य शोधायला हवा. विशेष म्हणजे इंद्रधनुष्य झेंडा हा एलजीबीटी समाजाचं प्रतीक आहे, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.

समलिंगी संबंध गुन्हा नाही, पण कलम 377 ही कायम

सुप्रीम कोर्टाने कलम 377 रद्द केलेलं नाही, तर त्यातून परस्पर सहमतीने समलिंगी संबंधाला गुन्हेगारी कक्षेतून वगळलं.कलम 377 अंतर्गत सहमतीने प्रौढांसोबत समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही. मात्र सहमतीशिवाय समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा असेल. तसंच मुलं आणि जनावरांशी अनैसर्गिक संबंध गुन्ह्याच्या कक्षेत असेल, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं.

निकालातील महत्त्वाचे मुद्दे-

प्रत्येकाला स्वत:च्या मर्जीने जगण्याचा अधिकार-जुनी विचारधारा बदलण्याची गरज-लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी-सहमतीने प्रौढांसोबत एकांतात समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा नाही

2013 मधील निकाल बदलला

सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये कलम 377 गुन्हा ठरवला होता. मात्र त्यावर अनेक वर्षांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आज आपला निकाल बदलला.समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्या. 17 जुलैला त्यावरची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर खंडपीठाने हा निर्णय राखून ठेवला होता.

परस्पर संमतीने दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींना शारीरिक संबंध ठेवण्यास मान्यता देणारा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय नाकारत, सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंध हा गुन्हा ठरवला होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने फेरयाचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेवर पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली आणि कोर्टाने आज ऐतिहासिक निर्णय दिला.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत