समाजवादी विचारांचा मी एकटाच..तरिही लढतो आहे-कपिल पाटील

 बाबा आढाव यांच्या हस्ते सत्कार

पुणे :रायगड माझा

सभागृहात समाजवादी विचारांचा एकटा असलो तरिही शिक्षणाच्या प्रश्‍नांसाठी लढतो आहे. शाळांचे खासगीकरणाचे विधेयक, खासगी विद्यापीठांचे विधेयक अशा शिक्षणाचे खासगीकरण करणाऱ्या विधेयकांच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठविणार आहे, अशी माहिती आमदार कपिल पाटील यांनी व्यक्‍त केली.

शिक्षक मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार कपिल पाटील यांच्या सत्काराचे आयोजन समाजवादी विचारांच्या संघटनांनी राष्ट्र सेवा दलात केले होते. समाजवादी विजयाची हॅट्रीक साजरी करण्यासाठी संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार राजू शेट्टी, राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, माजी न्यायपूर्ती प्रकाश परांजपे, प्रा. सुभाष वारे, सुशिला मोराळे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, अतुल देशमुख आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, बाबांच्या हस्ते माझा सत्कार होत असल्याने खूप आनंद झाला आहे. शिक्षक, बाबा आणि समाजवादी संघटनांच्या पाठिंब्यामुळेच निवडून आलो आहे.
डॉ.बाबा आढाव म्हणाले, देशात विषमता पराकोटीला गेली आहे. शिक्षण घेऊन देखील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नसल्याने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात 50 कोटी असंघटीत मजूर असून त्यांना कोणत्याच सुरक्षेचे कवच नाही. मात्र, याविरोधात रस्त्यावर उतरून विरोध होताना दिसत नाही. समाजवादी विचारांचे मतपेढी आणि तुरूंग प्रतिक आहे. समाजवादी कार्यकर्त्यांनी हतबल न होता एकत्र येऊन काम करायला हवे. आपण सर्वांनी राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजविण्यासाठी प्रयत्न करावे, असे डॉ. आढाव यांनी सांगितले.
तर डॉ. खैरनार म्हणाले, देशाची वाटचाल पोलंड आणि जर्मनीच्या मार्गावर होत आहे. सामान्य लोक जामावाने लोकांना ठेचून मारत आहे. राष्ट्रसेवा दलाचे काम थोडं थंडावले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला पर्याय देण्याची ताकद एकमेव राष्ट्र सेवा दलाकडे आहे. त्यामुळे राष्ट्र सेवा दलाला वाढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत