सरकारची स्मार्ट सिटीची संकल्पना फेल; मोटरसायकल लाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार

कल्याण : रायगड माझा वृत्त 

स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखविणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणेदेखील शक्य झालेले नाही. पाण्यासाठी निघणारे मोर्चे आणि आंदोलने नित्याचीच आहेत, मात्र शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गौरीपाडा या वेगाने विकसित होत असलेल्या प्रभागात चार दिवसांपूर्वी मोटरसायकल लाइटच्या उजेडात मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागल्याचा प्रकार समोर आला. याबाबत आगरी सेनेचे कल्याण तालुका अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन सादर करत प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतीनिधींना जाब विचारत मूलभूत सुविधा देण्याची मागणी केली.

केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महापालिकेची स्मार्ट सिटीमध्ये निवड केली. यामुळे शहर स्मार्ट होण्याची स्वप्ने दाखविली जात असली तरी प्रत्यक्षात मोठ्या रकमेचा मालमत्ता कर भरूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून दूर आहेत. रस्ता, पाणी, रुग्णालय, मैदान अशा मूलभूत सुविधांअभावी नागरिकांना आंदोलने करावी लागत आहेत. कल्याण पश्चिमेकडे गौरीपाडा येथे गगनचुंबी इमारती उभ्या राहत असून या प्रभागात स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. स्मशानात वीज किंवा पाण्याची सोय नाही. गौरीपाड्यापासून तब्बल एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने मृतदेह नेताना खाचखळग्यातून प्रवास करावा लागतो. आठवडाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्यावर मोटरसायकलच्या लाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर यांनी याबाबत संताप व्यक्त केला. ही स्मशानभूमी शहरालगत असूनही रस्ता, वीज व पाण्याची सोय नाही, ही लाजीरवाणी बाब असल्याची टीका त्यांनी केली. गेल्या ३५ वर्षांत आजवरच्या कोणत्याही पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींने उल्लेखनीय काम केलेले नाही. पालिकेची मूलभूत सुविधा पुरवण्याची ऐपत नसेल तर या गावांना पालिकेतून वगळून त्यांची ग्रामपंचायत करावी, ज्यामुळे विकासाच्या नावाखाली भूमिपुत्राच्या जमिनी लाटत विकासकांना आंदण देण्याला लगाम लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ठाणकर यांनी चार पानांचे पत्र आयुक्तांना पाठवले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत