सरकारच्या अट्टाहासाने नागपूर अधिवेशनात फज्जा; विधानभवनाच्या परिसरात साचले पाणी

नागपूर : रायगड माझा वृत्त 

पावसाळी अधिवेशनाचे आजचे सत्र सुरू होण्याआधीच विधानभवनातील वीज पुरवठा पावसामुळे खंडित झाला आहे. पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले. विधानभवनातील तळमजल्यावर पाणी साचल्याने वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी कामकाज ठप्प झाल्याने विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, वीजपुरवठी खंडित झाल्याने अधिवेशनाचे आजचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.


विधानभवनाच्या तळघरात इलेक्ट्रिक केबिन मध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे दहा वाजता सुरू होणारे कामकाज एक तास उशिरा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली.

दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. यंदा युती सरकारने पावसाळी अधिवेशनही नागपूरला घेण्याचा निर्णय घेतला. ‘नागपूरमध्ये पावसाळ्यात वाहतूक, वीजेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची राहण्या-जेवणाची सोय इथे करावी लागणार आहे, त्यातही अडचणी निर्माण होऊ शकतात, याची कल्पना आम्ही सरकारला दिली होती. पण पावसाळी अधिवेशन नागपुरातच व्हावे, अशा मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास होता,’      विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

वीज नसल्याने अधिवेशनाचे काम बंद करावे लागल्याची ही पहिलीच वेळ आहे, याला सरकारचा नाकर्तेपण जबाबदार असल्याचे टीका विरोधकांनी केली आहे. ‘केवळ पावसाने वीज पुरवठा खंडित होण्यामुळे विधान सभेचे कामकाज न होणे ही सरकार साठी भूषणावह नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात हा काळा दिवस म्हणून गणला गेला पाहिजे,’ असा संताप राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईमध्ये थोडा पाऊस झाला तर महापालिकेला दोषी धरले जाते. आता थेट विधानभवनाच्या तळघरात पाणी शिरला आहे, तेव्हा कुणाला दोषी धरायचे असा सवाल शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशन नागपूर मध्ये होत असताना आवश्यक ती काळजी का घेण्यात आली नाही, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ही प्रभू यांनी केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत